ऊस उत्पादकांत अस्वस्थता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऊस उत्पादकांत अस्वस्थता
ऊस उत्पादकांत अस्वस्थता

ऊस उत्पादकांत अस्वस्थता

sakal_logo
By

68008
करुळ ः तळेरे-गगनबावडा महामार्गावरील करूळ घाटरस्त्याला पावलोपावली खड्डेच खड्डे दिसून येत आहेत.

68009
वैभववाडी ः जिल्ह्यात ऊसतोडणी धिम्यागतीने सुरू आहे.


ऊस उत्पादकांत अस्वस्थता

तोडणी धिमी; नादुरुस्त घाटामुळे तोडणी पूर्णत्वास एप्रिल उजाडणार

एकनाथ पवार ः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ९ ः ऊस गाळप हंगाम सुरू होऊन तब्बल ७५ दिवसांचा कालावधी लोटला असला तरी आतापर्यंत जिल्ह्यातील अवघ्या ४ हजार टन उसाची तोडणी झाली आहे. नादुरूस्त करूळ घाटरस्त्यामुळे यावर्षीही जिल्ह्यातील ऊसाची वाट बिकटच असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आतापासूनच अस्वस्थता पसरली आहे.
जिल्ह्यात ऊस लागवडीतून शेतकरी आर्थिक समृद्ध होईल, अशी शाश्वती वाटत असतानाच जिल्ह्यातील ऊस शेतीला विविध ग्रहणे लागली आहेत. गेल्या काही वर्षांपासून ऊसतोडणी हा ऊस लागवड क्षेत्रातील कळीचा मुद्दा ठरला आहे. मात्र, गेल्या वर्षीपासून वेगळ्याच समस्येला येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील बहुतांशी ऊस असळज (ता.गगनबावडा) येथील डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याला जातो. या उसाची वाहतूक करूळ घाटमार्गे केली जाते; परंतु, हा घाटमार्ग अवजड वाहतुकीस दरवर्षी धोकादायक बनत असल्यामुळे उसाची वाहतूक करण्यास ट्रक चालक तयार होत नाहीत. गेल्या वर्षी देखील या रस्त्यामध्ये मोठ मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रकचालकांनी जोपर्यत रस्ता दुरूस्त केला जात नाही, तोपर्यत ऊस वाहतुक करणार नाही, अशी भुमिका घेतली होती. त्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा, निवेदने, उपोषण आणि त्यानंतर संभाजी चौकात जनआंदोलन छेडले होते. त्या आंदोलनानतंर महिनाभराने रस्ता दुरूस्ती करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. ऊस तोडणी एप्रिल अखेरपर्यत लांबली. उसाच्या वजनात मोठी घट झाली. अनेकांचे उत्पादन निम्म्यावर आले. शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे आर्थिक नुकसान झाले.
गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील ऊसाची वाट बिकटच दिसून येत आहे. करूळ घाटात यावर्षी देखील खड्डेच खड्डे पडलेले आहेत. ठेकेदाराने काही ठिकाणचे खड्डे बुजविल्याचा आभास निर्माण केला. परंतु, परिस्थिती जैसे थे आहे. अनेक धोकादायक वळणावर दीड दोन फुटाचे खड्डे पडल्यामुळे अवजड वाहने कलंडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे यावर्षी देखील ट्रकचालक जिल्ह्यातील ऊस वाहतूक करण्यास सकारात्मक नाहीत. साखर कारखाना गाळप हंगामाला २३ ऑक्टोंबरपासून सुरूवात झाली आहे. तोडणीला ७५ दिवसांचा कालावधी लोटला आहे. मात्र, आतापर्यत ४ हजार टन ऊसाची तोडणी झाली आहे. काही शेतकऱ्यांनी स्वतःहून तोडणी करून ऊस कारखान्याला दिला आहे. ऊस वाहतुक भुईबावडा घाटमार्गे करावी लागत असल्यामुळे ट्रकचालकांना दहा ते बारा किलोमीटरचे अंतर वाढत आहे. त्यामुळे त्यांना ज्यादाचे पैसे ट्रकचालक आणि तोडणी करणाऱ्या कामगारांना मोजावे लागत आहेत. जिल्ह्यात सध्या दहा तोडणी टोळ्या कार्यरत आहेत. इतक्या धिम्या गतीने तोडणी सुरू राहिल्यास यंदाही ऊस तोडणीला एप्रिल उजाडेल, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे दिवसागणीक शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढत आहे.
------------
चौकट
लोकप्रतिनिधी सुशेगाद
जिल्ह्याच्या अर्थकारणात ऊसशेतीने भक्कम स्थान निर्माण केले होते. दोन तीन वर्षापूर्वी ऊस शेतीखालील क्षेत्राने १ लाख टनाचा पल्ला पार केला. परंतु, रस्त्यासारख्या समस्येने जिल्ह्यातील ऊस उत्पादन धोक्यात आले आहे. असे असले तरी येथील लोकप्रतिनिधी मात्र सुशेगाद आहेत. त्यांना शेतकऱ्यांचा कसलाच कळवळा दिसून येत नाही. अशी चर्चा सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये ऐकू येत आहे.
------------
कोट
जिल्ह्यात दहा ऊस तोडणी समुह कार्यरत आहेत. आतापर्यंत चार हजार टन ऊस तोडला आहे. रस्ता नादुरूस्त असल्यामुळे भुईबावडा घाटमार्गे ऊस वाहतूक केली जात आहे. करूळ घाट दुरूस्त झाल्यास तोडणी गतीने होईल.
- बी. जी. शेळके, पर्यवेक्षक, डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखाना
------------
कोट
करूळ घाटरस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम काही अंशी करण्यात आलेले आहे. या रस्त्यांच्या नूतनीकरणाची निविदा प्रकिया सुरू असून ती पूर्ण होताच या रस्त्याचे सिलकोट, कारपेट करण्यात येणार आहे. या महिना अखेरीपर्यंत निविदा प्रकिया पूर्ण होईल.
- अतुल शिवनिवार, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरण
-----------
कोट
गेल्यावर्षी ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झालेच. परंतु, यावर्षी देखील शेतकऱ्यांचे नुकसान अटळ आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तत्काळ करूळ घाट दुरूस्त करावा, अशी मागणी आहे.
- किशोर जैतापकर, ऊस उत्पादक शेतकरी, नापणे