फोटोसंक्षिप्त-मुणगे उपकेंद्रास वजन काटे सुपूर्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोसंक्षिप्त-मुणगे उपकेंद्रास वजन काटे सुपूर्द
फोटोसंक्षिप्त-मुणगे उपकेंद्रास वजन काटे सुपूर्द

फोटोसंक्षिप्त-मुणगे उपकेंद्रास वजन काटे सुपूर्द

sakal_logo
By

६८०६०
मुणगे प्राथमिक आरोग्य
उपकेंद्रासाठी वजन काटे सुपूर्द
मुणगे ः येथील यशस्विनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंद मालाडकर, संघर्ष मित्रमंडळ आडबंदर-मुंबई यांच्यावतीने मुणगे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी लहान मुलांचा वजन काटा आणि प्रौढांसाठी डिजिटल वजन काटा प्रभाग क्रमांक १ च्या प्रभाग सेविका रविना मालाडकर, अंजली सावंत, माजी उपसरपंच तथा प्रभाग सेवक धर्माजी आडकर यांच्या हस्ते देणगी स्वरुपात देण्यात आला. यावेळी उपआरोग्य केंद्रांच्या परिचारिका एन. एस. चराटकर, सुचित्रा मुणगेकर, आशा आरोग्यसेविका दुर्गा परब, आश्र्विनी मेस्त्री, अंकिता मुणगेकर आदी उपस्थित होते. याबाबत परिचारिका चराटकर यांनी सर्व कर्मचारी वर्गाच्यावतीने आनंद मालाडकर यांचे आभार मानले.
-------
६८०६१
रंगभरण स्पर्धेस माणगावात प्रतिसाद
माणगाव ः येथील श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालयाने आयोजित केलेल्या रंगभरण चित्रकला स्पर्धेमध्ये माणगावमधील प्राथमिक शाळांमधून तीन गटातून ६९ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यात पहिली व दुसरी गटात २४, तिसरी व चौथी गटात २४ तर पाचवी ते सातवी गटात २१ विद्यार्थी सहभागी झाले. वाचनालयाचे अध्यक्ष परशुराम चव्हाण, सहसचिव मेघ:श्याम पावसकर, संचालक शरद कोरगावकर, विजय केसरकर, सर्व कर्मचारी तसेच शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाचनालयामार्फत वर्षभरात विविध उपक्रम घेतले जातात. प्रत्येक गटातून गुणानुक्रमे पहिल्या तीन क्रमांकाना आणि उत्तेजनार्थ एका क्रमांकाला वाचनालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात गौरविण्यात येणार आहे.
---
पर्वतांच्या महत्त्वाबाबत जनजागृती
खोपोली : अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ आणि यशवंती हायकर्स खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. ११) झेनिथ धबधबा (सुभेदार धबधबा) परिसरात जागतिक पर्वत दिन साजरा करण्यात आला. जागतिक पर्वत दिनाचा हा सोहळा डॉ. प्रताप पाटील, प्राचार्य के. एम. सी. महाविद्यालय व वन अधिकारी खालापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. निवृत्त शिक्षिका उषा केळबायकर यांनी खोपोलीमधील भानवज परिसरामध्ये असंख्य झाडे लावली आणि त्यांचे संवर्धनही केले. त्यांच्या या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना यानिमित्त सन्मानित करण्यात आले. खोपोली शहराच्या भोवताली असलेल्या पर्वतावर मोठ्या प्रमाणावर वणवा लावण्यात येतो. त्यामुळे जीवसृष्टीला हानी पोहोचते. अशा प्रकारे लागणारे वणवे नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकप्रबोधन करून पर्वतांचे महत्त्व समजावून देण्यासाठी यशवंती हायकर्स खोपोली एक जनजागृती अभियान राबवणार आहे. त्या अभियानाला के. एम. सी. महाविद्यालय खोपोली आणि वन विभागाने सहकार्य करून अभियान यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन यशवंती हायकर्सचे अध्यक्ष डॉ. महेंद्र भंडारे यांनी केले.
--
आयुर्वेद प्रसारासाठी आयुर्वेद रथयात्रा
वडखळ : प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य गुरूवर्य प्रभाकर तानाजी जोशी उर्फ नाना जोशी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पेण येथे प्रभा आयुर्वेद फाउंडेशन महाराष्ट्राच्या आणि पेण आयुर्वेदिक डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने आयुर्वेदाची प्रचार आणि प्रसारासाठी सुरू असलेली प्रभा आयुर्वेद रथयात्रा शनिवारी (ता. १०) पेणमध्ये दाखल झाली. या रथयात्रेचे पेण शहरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. रथयात्रेच्या माध्यमातून पेणमधील सुमारे ३०० पेक्षा अधिक रुग्णांवर मोफत आयुर्वेदिक उपचार करून औषधे देण्यात आली. पेण तालुक्यातील आयुर्वेदिक डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने ही संधी पेणकरांना उपलब्ध करून देण्यात आली. पेणनगरीच्या प्रवेशद्वाराजवळून निघालेल्या या भव्ययात्रेचे स्वागत महात्मा गांधी मंदिर येथे करण्यात आले. रथ यात्रेच्या माध्यमातून संधिवात, मुळव्याध, पोटाचे विकार, दमा, त्वचा विकार, मुतखडा, श्वसनाचे विकार, स्त्रियांचे आजार, मणक्याचे आजार, अर्धशिशी, पित्ताचे आजार आणि अन्य आजारांवर उपचारपद्धती देऊन रुग्णांना दिलासा देण्यात आला. या शिबिरात सात दिवसांची आयुर्वेदिक औषधे मोफत देण्यात आली.
---
दिव्या नायकची चमकदार कामगिरी
रसायनी : खेलो इंडियाअंतर्गत मुलींच्या १७ वर्षांखालील रायगड जिल्हा फुटबॉल संघाने पश्चिम विभागीय स्पर्धेत सहभागी होऊन उपविजेतेपद पटकावले. मुंबईतील कुलाबा येथील कुपरेज मैदानावर झालेल्या या स्पर्धेत नवीन पोसरी येथील दिव्या दुर्गादास नायक हिने जिल्हा संघातून चमकदार कामगिरी केली. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि मुंबई डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते विजेत्या संघांना गौरवण्यात आले. दिव्याने मिड फिल्डर म्हणून चांगला खेळ केला. फुटबॉल क्षेत्रात तिचे पदार्पण वयाच्या १० व्या वर्षी सेवन स्टार फुटबॉल अकॅडमी उरणमार्फत झाले. तेथून तिने फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.
--
मानवी हक्क दिनानिमित्त प्रभातफेरी
माणगाव : तहसील कार्यालय माणगाव यांच्या वतीने जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त तहसीलदार प्रियांका आयरे, मंडळ अधिकारी विश्वास गडदे यांनी जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त इंदापूर तळाशेत नवजीवन विद्यामंदिर येथे शनिवारी प्रभात फेरी काढली होती. तलाठी सजा इंदापूरअंतर्गत नवजीवन विद्यामंदिर तळाशेत या ठिकाणाहून मानवी हक्क जनजागृती प्रभातफेरी निघाली होती. यानिमित्त हायस्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले. तलाठी समीरा खाडे, विद्यालयाचे प्राचार्य गावडे, पर्यवेक्षक सुरवसे, सहायक शिक्षक जाधव, एस. पी. पवार आदी उपस्थित होते.
---
चित्रपट निर्माते सिकंदर सय्यद यांचा सन्मान
रसायनी : विक्रमशिला हिंदी विद्यापीठ भागलपूर बिहार यांचा ५१वे हिंदी महाअधिवेशन व मानद सारस्वत समारोह रविवारी (ता. ११) पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यात मोहोपाडा रसायनी येथील जन्मभूमीतील चित्रपट निर्माते सिकंदर ईमाम सय्यद यांना कुलगुरू डॉ. संभाजी राजाराम बाविस्कर, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीवजी सोनवणे, कुलगुरू डॉ. शिवलाल जाधव, कुलगुरू डॉ. राज देवदास यांच्या हस्ते डि-लीट पदवी बहाल करून सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. चित्रपट निर्माता सिकंदर सय्यद यांना त्यांच्या कार्याबद्दल विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यांना डि -लिट पदवी मिळाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
--
घारापुरी येथे स्वच्छता मोहीम
उरण : महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडातर्फे घारापुरी येथे रविवारी (ता. ११) स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात उरणमधील ३९६ सदस्य उपस्थित होते. या वेळी श्री सदस्यांनी समुद्रकिनारा व सभोवतालचा परिसर स्वच्छ केला. अभियानात एकूण ५३ टन ओला आणि १२ टन सुका कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली.