
सिंधुदुर्ग विकासाला पर्यटनातून चालना
68087
मोपा ः येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
सिंधुदुर्ग विकासाला पर्यटनातून चालना
पंतप्रधान नरेंद्र मोदी ः मोपा विमानतळाचे उद्घाटन, संकल्पित विविध विकासात्मक प्रकल्पांवर भाष्य
निलेश मोरजकर ः सकाळ वृत्तसेवा
मोपा, ता. १२ ः कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाल्यामुळे त्याचा फायदा भविष्यात देशातील पहिला पर्यटन जिल्हा घोषित झालेला सिंधुदुर्ग व गोवा राज्याला होणार आहे. यामुळे परिसरातील विकासकामांना देखील चालना मिळणार आहे, असे मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोपा (गोवा) येथे व्यक्त केले.
मोपा येथे आंतरराष्ट्रीय ग्रीनफिल्ड विमानतळचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी येथे आयोजित जाहिर सभेत मोदी यांनी संकल्पित विविध विकासात्मक प्रकल्पांवर भाष्य केले. गोवा राज्यात विकासाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच धार्मिक पर्यटनासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यामुळे पर्यटन वाढीला चालना मिळणार असून येथील देवस्थानांची माहिती ही सर्वदूर पोहचण्यास मदत होणार आहे.
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ''मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट'' असे नामकरण करत मोदी यांनी विमानतळाचे उद्घाटन केले. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय नागरी उड्डान मंत्री ज्योतीरादित्य सिंधीया, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लाई, पेडणे आमदार प्रवीण आर्लेकर आदी उपस्थित होते.
श्री. मोदी म्हणाले, "गोवा व कोकण प्रांत हा आंब्यांसाह विविध फळांसाठी प्रसिद्ध आहे. येथील फळांसह विविध फार्मा प्रॉडक्ट्स हे जगाच्या कानकोपऱ्यात नेण्यासाठी मोपा विमानतळचा वापर करून घेतला जाईल. यामुळे या परिसरात रोजगाराच्या नव्या संधी सुद्धा प्राप्त होणार आहेत. या विमानतळाची सध्याची प्रवासी क्षमता ही ४० लाख आहे. २१०० एकर क्षेत्रात उभारण्यात आलेल्या या विमानतळची भविष्यातील प्रवासी क्षमता ही साडेतीन करोड प्रवासी वाहतुकीची असेल आसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातील छोट्या छोट्या शहरांना हवाई वाहतुकीने जोडण्याचे काम हे आमच्या सरकारने केले. देशात नवीन ७० विमानतळे उभारण्यात आली आहेत. दररोज १४ करोड प्रवासी हवाई सेवेचा वापर करत आहेत. त्यामुळे हवाई प्रवास करणारा भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. देशात पर्यटक वृद्धी होण्यासाठी व्हिजामध्ये शिथिलता आणली आहे. दरवर्षी लाखो पर्यटक हे गोव्याला भेट देतात. याचा मोठा फायदा नजीकच्या काळात गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्याला होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोपा विमानतळला जोडणारा ६ किलोमीटर लांबीचा रस्ता प्रास्तावित असून त्याची पायाभरणी लवकरच करण्यात येईल. यासाठी केंद्र सरकार पूर्णपणे सहकार्य करणार आहे. गोव्यात वाहतुकीसाठी १० हजार कोटी रुपयांची कामे मंजूर असून अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. सुरुवातीला २० राष्ट्रीय व १२ आंतरराष्ट्रीय उड्डाणे नियमित सुरु होणार असल्याने भविष्यात या परिसराचा कायापालट होणार आहे."
---------
चौकट
५० हजार वृक्षारोपणाचे नियोजन
गोवा व कोकण प्रांत हा घनदाट वनसंपदेने समृद्ध आहे. ग्रीनफिल्ड विमानतळ प्रकल्पासाठी तोडण्यात आलेल्या झाडांची भरपाई करण्यासाठी नव्याने ५० हजार झाडांची या परिसरात लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. स्थानिक भूमिपुत्रांना जास्तीत जास्त संख्येने नोकरीत सामावून घेण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, अशा सूचना मोदी यांनी दिल्या.