
महाड तालुका तहानलेलाच!
महाड तालुका तहानलेलाच!
महापुरातील बाधित नळपाणी योजना अडचणीत
महाड, ता. १२ : मागील वर्षी २२ व २३ जुलैला आलेल्या महापुरात; तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेले तालुक्यातील अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत व नळपाणी पुरवठा योजना यांच्या दुरुस्तीसाठी सरकारकडून एकही रुपयाचा निधी न आल्याने या पाणीपुरवठा योजना अडचणीत सापडल्या आहेत. स्थानिक पातळीवर तात्पुरती डागडुजी करून ग्रामपंचायती कशातरी या योजना चालवत असल्या, तरी त्या कधीही बंद पडण्याचा धोका आहे.
महाड तालुका हा मुळातच टंचाईग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात वस्ती असल्याने येथे पाणीपुरवठा योजना राबवणेही कठीण असते. अशा स्थितीत पाणीपुरवठा विभागाकडून तालुक्यातील ग्रामीण भागांत अनेक नळपाणी योजना राबवल्या गेल्या आहेत; परंतु अतिवृष्टीने योजनांना बाधा पोहोचली आहे. महाड तालुक्यात गतवर्षी २२ जुलैला महापूर आला होता. यामध्ये घरे, शेती, दुकाने, रस्ते, सरकारी इमारती, पूल आदी मालमत्तांप्रमाणेच गावागावांतील नळपाणीपुरवठा योजनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यातील बहुतांश पाणीपुरवठा योजना या नदीकिनारी असल्याने पुराच्या पाण्याच्या प्रवाहात जलवाहिनी वाहून गेली. काही ठिकाणी तर पंप घर, जॅकवेलचीही पडझड झाली आहे. महाड ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अहवालानुसार महाड तालुक्यामध्ये जवळपास ७२ नळ पाणीपुरवठा योजना, तर १५ विहिरी आणि दोन तलावांचे नुकसान झाले आहे. हा नुकसानीचा अहवाल महाड ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने वरिष्ठ कार्यालयाकडे त्वरित सादर केला होता. तेथून तो राज्य सरकारकडे दाखल झाला आहे. महाड पाणीपुरवठा विभागाकडून या सर्व योजनांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर केला असून, यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला सुमारे ३ कोटी रुपयांची गरज लागणार आहे; परंतु या बाधित योजनांना अद्यापही निधी मिळालेला नाही. राजेवाडी, भावे, कांबळेतर्फे बिरवाडी, कुंभे शिवथर, पारमाची, बारसगाव, वरंध, गोठे बु, मोहोत, कोथूर्डे, नागाव, वाळसुरे, चापगाव, पडवी पठार, आकले, मोहोप्रे, काळीज, बिरवाडी, कोंडीवते यांसह अन्य गावांतील नळ पाणीपुरवठा योजनांचे आणि रानवडी, वाळण येथील पंपगृहाचे नुकसान झाले आहे. तर कोल आणि नागाव या गावामधील विहीर वाहून गेली आहे.
--
कोट
महापुरामुळे ग्रामीण भागातील नळ पाणीपुरवठा योजना, विहिरी आणि तलाव बाधित झाले आहेत. त्यांची माहिती व दुरुस्ती प्रस्ताव तत्काळ वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. या योजनांच्या दुरुस्तीसाठी लागणाऱ्या निधीची मागणी करण्यात आली आहे.
- जगदीश फुलपगारे, शाखा अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, महाड