
राजापूर-टोलवसुलीबाबत आज नीलेश राणेंची संघटनांशी चर्चा
टोलवसुलीबाबत आज
राणेंची संघटनांशी चर्चा
राजापूर, ता. १२ः गेल्या काही दिवसांपासून मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्यातील हातिवले येथील टोलनाका सुरू करण्यासह वसुलीला जोरदार विरोध केला जात आहे. अशा स्थितीमध्ये भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे मंगळवारी (ता. १३) टोलवसुली विरोधातील आंदोलनाबाबत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह टोलविरोधी संघटनांशी चर्चा करणार आहेत.
तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम ठिकठिकाणी अपुरे असताना हातिवले येथील टोलनाक्यावर टोलवसुली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या टोलवसुलीला स्थानिकांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. महामार्गाचे जोपर्यंत शंभर टक्के काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलवसुली करू नये, तालुक्यातील वाहन चालकांना टोल आकाऊ नये, यासह अन्य विविध मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत टोलवसुली करू नये अशी मागणी सर्व राजकीय पक्षांकडून केली आहे. भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे मंगळवारी राजापूर दौऱ्यावर येणार आहेत. नगर पालिकेच्या जवाहर चौक येथील पिकअप शेड सभागृहामध्ये दुपारी तीन वाजता राणे टोलमाफीबाबत सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध वाहतूक व अन्य संघटना, व्यापारी यांच्यासोबत बैठक करून चर्चा करणार आहेत. या बैठकीच्या माध्यमातून टोलवसुली विरोधातील आंदोलन अधिक आक्रमक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानंतर आडिवरे विभागातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सायंकाळी ६ वाजता तावडे भवन येथे संवाद साधणार आहेत.