''विरगळ'' रत्नागिरीच्या इतिहासाचे साक्षीदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''विरगळ'' रत्नागिरीच्या इतिहासाचे साक्षीदार
''विरगळ'' रत्नागिरीच्या इतिहासाचे साक्षीदार

''विरगळ'' रत्नागिरीच्या इतिहासाचे साक्षीदार

sakal_logo
By

rat11p22.jpg -
67826
संगमेश्वर - कसबा संगमेश्वर येथील विरगळ.

‘विरगळ’ रत्नागिरीच्या इतिहासाचे साक्षीदार
अभ्यासक महेश कदम : सहयाद्रीच्या पायथ्याशी आढळ
रत्नागिरी, ता. ११ : प्राचीन मंदिरे, लेणी, किल्ले हे रत्नागिरीच्या संपन्न इतिहासाचे साक्षीदार असून यातील महत्त्वपूर्ण असे पराक्रमाची गाथा सांगणारे स्मृतीचिन्ह म्हणजे ‘वीरगळ’ आहे. या वीरगळींचे जतन करणे आवश्यक आहे, असे अभ्यासक महेश कदम यांनी सांगितले.
पर्यटन करत असताना जिल्ह्यातील अनेक किल्ले, मंदिरे, किनारे येथील परिस्थितीची माहिती कदम यांनी घेतली आहे. त्याचा सखोल अभ्यास करून इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत हे मांडण्याचे काम ते करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी व विशेषतः सह्याद्रीच्या पायथ्याशी तळकोकणात वीरगळी, सतीशिळा, दानशिल्प दृष्टीस पडते. सतीशिळा म्हणजे योद्धा समरांगणात वीरगतीस प्राप्त झाल्यानंतर त्याची पत्नी सती जाई, तिच्या स्मरणार्थ वीरगळ सारखी, चुड्यासह सतीचा हात दर्शवणारी सतीशिळा उभारली जायची. प्राचीन काळात गुरांना चरण्यासाठी वनाचा काही प्रदेश दान स्वरूपात दिला जात असे, ते गाय-वासरूच्या शिल्पात छोट्या दगडावर कोरलेले दिसते. परशुराम मंदिर-कोळकेवाडी-खडपोली चिपळूण, देवडे तर्फ साखरपा, भैरी मंदिर रत्नागिरी, देवळे-कुंडी देवरूख,कसबा संगमेश्वर, खडपोली चिपळूण, खांबतळे-उतेकरवाडी-चोरवणे-देवघर खेड, धूतपापेश्वर मंदिर राजापूर,साठवली लांजा इत्यादी ठिकाणी वीरगळ, सतीशिळा आजही पहायला मिळतात. ही आपल्या इतिहासाची जिवंत स्मारके असून, या सर्व स्मृतीशिलांचे योग्यरित्या संवर्धन व जतन होणे गरजेचे आहे.
या वीरगळ गावातील मंदिराबाहेर दिसून येतात. वीरगळ याचा अर्थ वीराचा दगड असा होतो. सुमारे सातशे ते आठशे वर्षांपूर्वी समरांगणात लढताना धारातिर्थी पडलेल्या वीराची समाधी बांधण्याची पद्धत नसल्याने, त्याची शौर्यगाथा लोकांच्या स्मरणात चिरकाल राहावी याकरिता वीरगळ उभारली जात असे. वीरगळ साधारणपणे दीड-दोन फुट रूंद ते चार फूट उंच अशा उभट सपाट आयताकृती दगडावर तीन ते पाच भागात कोरलेल्या असून, याचे वाचन पायथ्यापासून कळसापर्यंत केले जाते. सर्वात खालील भागात त्या वीराच्या युद्धप्रसंगाचे शिल्प, दुसऱ्या भागात तो वीर लढताना धारातिर्थी पडल्याचे, तिसऱ्या भागात सदर वीरास स्वर्गात नेण्यासाठी अप्सरा आल्याचे (लढाई मध्ये मरण पावलेला व्यक्ती स्वर्गात जात असल्याची तत्कालीन मान्यता होती) आणि चौथ्या भागात तो वीर शिवलिंगाची वा त्याच्या इष्टदेवतेची पूजा करताना दिसतो.

चौकट
वीरगळींचे दोन प्रकार
वीरगळीचे महत्त्व मंदिरासारखे असल्यामुळे,सर्वात वर कळसाचे शिल्प दिसून येते. वीरगळींचे स्तंभी व आयताकृती असे दोन प्रकार असून, स्तंभी वीरगळ वरीलप्रकारे चारी बाजूंनी कोरलेली असते. यांचे जतन करणे गरजेचे आहे, असे कदम यांनी सांगितले.