
मालगुंडमध्ये ठाकरे सेना विरुद्ध शिंदे-भाजुप युतीत तगडी लढत
rat१३३०.txt
( पान २ )
ठाकरे सेना विरुद्ध शिंदे-भाजप तगडी लढत
मालगुंड चर्चेत ; तालुकाप्रमुख साळवी यांचे होमपीच
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. १३ ः तालुक्यातील मालगुंड ग्रामपंचायतीमध्ये ठाकरे शिवसेना विरुद्ध शिंदे-भाजप युतीमध्ये जोरदार लढत होणार आहे. बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांचे हे होमपीच आहे. त्याला शिंदे गट आणि भाजप युतीने जोरदार टक्कर देण्याचे राजकीय डाव आखले आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये बंड्या साळवी आणि शिंदे गटाचे प्रकाश साळवी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
मालगुंड ग्रामपंचायत अनेक वर्षांपासून जुन्या शिवसेनेकडे आहे. बंड्या साळवी यांचे हे गाव असल्याने त्यांनी तेथे दबदबा कायम ठेवला आहे. त्यामुळे नेहमी बहुमताने ही ग्रामपंचायत शिवसेनेकडे राहायची; परंतु आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्याने सेनेतील दोन्ही गट या निवडणुकीत आमनेसामने ठाकले आहेत. नव्या राजकीय समीकरणांमुळे आता ही ग्रामपंचायत मिळवण्यासाठी बंड्या साळवी यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण, उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांचे समर्थक प्रकाश साळवी यांच्यावर मालगुंड ग्रामपंचायतीची धुरा आहे. येथे शिंदे गट आणि भाजप अशी युती असून भाजपला सरपंच पद सोडण्यात आले आहे. त्यामुळे येथे ठाकरे सेना आणि नवी युती ताकदीने उतरली असल्याने येथे ‘काटे की टक्कर’ होणार आहे.
मालगुंड ग्रामपंचायतीसाठी एकूण ११ जागा आहेत तर थेट सरपंच १ अशा एकूण १२ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. सुमारे २ हजार ६०० मतदार असून ७० टक्केच्या दरम्यान मतदान होते. त्यापैकी ठाकरे गटाची एक जागा बिनविरोध झाली आहे. त्यामुळे आता ११ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष आहे. बंड्या साळवी आणि प्रकाश साळवी या स्थानिक नेतृत्वांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यात उदय सामंत आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे याकडे विशेष लक्ष असल्याने निवडणुकीला आणखी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.
कोट...
मालगुंड ग्रामपंचायत ठाकरे सेनेकडे वर्षानुवर्षे आहे आणि या निवडणुकीतही या ग्रामपंचायतीवर ठाकरे सेनेचाच भगवा फडकणार. तालुक्यातील २३ पैकी बहुतेक ग्रामपंचायती ठाकरे सेनकडे येतील. शिवसेना आपली ताकद कायम ठेवेल.
- बंड्या साळवी, शिवसेना रत्नागिरी तालुकाप्रमुख
कोट...
मालगुंड ग्रामपंचायतची जबाबदारी प्रकाश साळवी यांच्याकडे आहे. तेथे सरपंचपद भाजपला दिले आहे. त्यामुळे शिंदे-भाजप युती म्हणून पुर्ण ताकदीने ही निवडणूक लढत आहोत. या वेळी येथे परिवर्तन नक्की आहे.
-गजानन पाटील, शिंदे सेनेचे तालुका समन्वयक