
बांद्यात पुन्हा चोरीचा प्रयत्न
बांद्यात पुन्हा चोरीचा प्रयत्न
निमजगावाडीतील प्रकार; संशयित मनोरुग्ण आश्रमात
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १३ ः शहरातील निमजगावाडी येथील महादेव सावंत यांच्या घरात मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या परराज्यातील चोरट्याला घरमालक सावंत यांच्यासह स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. काल (ता. १२) दिवसभरात घरात शिरून चोरीचा प्रयत्न करण्याची दुसरी घटना शहरात घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तो मानसिक रुग्ण असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी जबाब नोंदवून त्याची रवानगी आश्रमात केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील निमजगावाडी येथे मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास सावंत यांच्या घरात अज्ञात व्यक्ती शिरला. त्यांनी शिताफिने त्याला पकडले. यावेळी चोरट्याने सावंत यांना मारहाण देखील केली. झटापट झाल्याने सावंत यांच्या घराशेजारी राहत असलेले कुबल यांनी धाव घेत चोरट्याला दोरीच्या साहाय्याने बांधून ठेवले. आवाज ऐकून शेजारी वासुदेव भोगले, विशाल भोगले, विलास भोगले, विकी सावंत, शिवराम बहिरे, संजय सावंत यांच्यासह ग्रामस्थांनी धाव घेतली. ग्रामस्थांनी चोरट्याला पकडून बांदा पोलिसांच्या स्वाधीन केले. काल सकाळी भर दिवसा शहरात सदनिका फोडून परप्रांतीय कामगाराकडून चोरीचा प्रयत्न झाला होता. ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. आज सलग दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. शहरात कामानिमित्त राहत असलेल्या परप्रांतीय कामगारांची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी वासुदेव भोगले यांनी केली आहे.