
रिफायनरीच्या जनजागृतीसाठी राजापूर कार्यशाळा
रिफायनरीच्या जनजागृतीसाठी अॅक्शन मोडवर
तलाठी, ग्रामसेवकांची कार्यशाळा ; ग्रामस्थांपर्यत माहिती पोहचवणार
रत्नागिरी, ता. १३ः राजापूर तालुक्यातील प्रस्तावित बारसू येथील रिफायनरीबाबत जनप्रबोधन आणि जनजागृतीसाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार सोमवारी (ता. १२) शासकीय पातळीवर तलाठी आणि ग्रामसेवकांच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
रत्नागिरी जिल्हा आणि राज्याच्यादृष्टीने हा प्रकल्प अतिशय महत्वाचा ठरणार आहे. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे. या भूमिकेतून जनप्रबोधन करण्यात येत आहे. त्याला विविध गावांमधून सकारात्मक प्रतिसाद देखील मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड व हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांच्यावतीने जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात क्रूड ऑईल रिफायनिंग करणारी रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल उद्योग प्रस्तावित आहे. महाराष्ट्र शासनाचा उपक्रम, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे या प्रकल्पासाठी राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ, धोपेश्वर तसेच नाटे या परिसरातील जमिनीचे अधिग्रहण नियोजित आहे.
देशाच्या व राज्याच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचा असा हा प्रकल्प असून परिसराचा सर्वांगीण विकास करणारा आहे. लाखो युवक-युवतींना नोकरी व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणारा आहे. प्रकल्पाचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने स्थानिक प्रशासनाची मदत घेऊन समाजातील विविध घटकांचे प्रबोधन करण्याची मोहीम आखली आहे. प्रबोधनाच्या या कार्यशाळेस सुमारे ५० तलाठी व ५० ग्रामसेवक शासनाच्या इतर अधिकाऱ्यांसोबत उपस्थित होते.