
बॅंकिंगचे कलेक्शन मटक्याची रक्कम म्हणून हडप
बॅंकिंगचे कलेक्शन मटक्याची रक्कम म्हणून हडप
व्यापाऱ्याची तक्रार; शिवारआंबेरे, जाकादेवीतील प्रकार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ः दुकानातील २ लाख ५० हजार रुपये तिघांनी नेल्याची तक्रार विकास चंद्रकांत मयेकर (रा. शिवारआंबेरे, जाकादेवी) यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे दिली. चोरीची घटना शनिवारी (ता. १०) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शिवारआंबेरे-जाकादेवी येथे घडली होती.
विकास मयेकर यांनी अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, शिवार आंबेरे येथे त्यांचे किराणा व अन्य वस्तूंच्या विक्रीचे दुकान आहे. ते ऑनलाइन बॅंकिंग व्यवहारही करतात. तसे प्रमाणपत्रही त्यांच्याकडे आहे. शनिवारी त्यांची बहीण रश्मी रूपेश पाटील या दुकानात होत्या. पोलिसांच्या गाडीतून तिघे त्यांच्या दुकानात आले. आम्ही पोलिस अधीक्षक कार्यालयातून आलो आहोत, असे सांगून तुमच्या येथे मटका जुगार व्यवसाय चालतो अशी माहिती मिळाल्याचे सांगितले व दुकानात घुसून शोधाशोध केली. त्यांना जुगाराबाबत कोणतेही साहित्य किंवा मुद्देमाल मिळून आला नाही. त्यांच्या दुकानात बसलेले त्यांचे बहिणीचे पती रूपेश विष्णू पाटील यांचे मोबाईलवर मटका जुगाराचे आकडे टाईप केले असल्याचे सांगून मी बॅंकिंग व्यवहाराची कलेक्शन केलेली दुकानातील रोख रक्कम २ लाख ५० हजार घेऊन गेले व याबाबत कोणताही पंचनामा केलेला नाही किंवा घटनास्थळी जबाब नोंदवलेला नाही. याबाबत मयेकर यांनी पावस म्हणजेच पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिसात तक्रार नोंदवण्यास गेले असता पोलिस निरीक्षक जाधव यांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करा. ते आदेश देतील, असे सांगून पोलिस ठाण्यातून पाठवून देण्यात आले.
मयेकर यांनी मी बॅंकिंग व्यवसाय करत असून व्यवसायातून जमा केलेली कायदेशीर रक्कम २ लाख ५० हजार दुकानात ठेवलेली असताना व तसा पुरावा माझ्याजवळ असताना दोन पोलिस म्हणवणाऱ्यांनी मटका जुगाराबाबत धाड टाकून किंवा तसा बनाव करून कोणतीही कायदेशीर पूर्तता म्हणजेच पंचनामा अथवा जप्ती पंचनामा न करता माझी रक्कम नेली. ती मला परत मिळावी, असे तक्रारीत म्हटले आहे.