वातावरण बदल, प्रदूषणाने नवी मुंबईकर झाले बेजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वातावरण बदल, प्रदूषणाने 
नवी मुंबईकर झाले बेजार
वातावरण बदल, प्रदूषणाने नवी मुंबईकर झाले बेजार

वातावरण बदल, प्रदूषणाने नवी मुंबईकर झाले बेजार

sakal_logo
By

वातावरण बदल, प्रदूषणाने
नवी मुंबईकर झाले बेजार
तुर्भे, ता. १३ : राज्यात गोवरच्या साथीचा उद्रेक झाला असताना गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईकर खोकला आणि घशाच्या खवखवीने हैराण केले आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांसह वाढलेल्या प्रदूषणामुळे हे प्रकार होत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.
नोव्हेंबर व डिसेंबरमधील वातावरणातील बदलामुळे सध्या खोकला, घशाची खवखव याचा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे. त्यामुळे घशाची खवखव व खोकल्याच्या रुग्णांच्या संख्येत साधारणपणे २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. यासोबतच हवेत काहीसा गारवा पसरल्याने त्वचा कोरडी पडली जाते. त्यामुळे त्वचेला खाज येणे किंवा पुरळ उठणे अशा त्वचेबाबत समस्या देखील वाढल्या असल्याने त्याचे रुग्ण देखील वाढत आहेत. त्यातच दिवसभर ढगाळ तर कधी कडक उन्ह त्यातच रात्री बोचरी थंडी त्यामुळे बदलत्या वातावरणाचा फटका लहानांपासून ते वयोवृद्धांना देखील बसत आहे. नवी मुंबईमध्ये सध्या रात्री थंडी तर दिवसा कडक उन्हाळा असे वातावरण आहे. त्यातच हवामान घसरल्याने या वातावरण बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.

आजारांची कारणे
सध्या बदलत असलेले वातावरण, नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेले बांधकाम आणि हवेतील परागकण यामुळे नागरिकांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसा गरमी तर रात्री थंडी असे वातावरण असल्याने त्याचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळेच खवखव, खोकला, सर्दीसारखे आजार होत आहेत.

ज्येष्ठांसह लहान मुलांना धोका
खासगी व सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांकडे घशातील खवखव व खोकल्याच्या रुग्णांमध्ये ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वातावरण बदलामुळे कान-नाक-घसा रुग्णालयामध्ये वाढू झाली आहे. मात्र, काही दिवसांपासून ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांना घशाची खवखव, खोकला, सर्दी यासारख्या आजार होत असल्याचे दिसत आहे.
--
कोट
वातावरण बदलांमुळे खोकला, घशातील खवखव असे आजार बळावले आहेत. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
-डॉ. राजश्री पाटील, आरोग्य अधिकारी, माथाडी हॉस्पिटल
---------

ऑनलाईन फसवणुकीनंतर
पोलिसांनी खाते गोठवले
घाटकोपर ः ओशिवरा पोलिसांनी एका ऑनलाईन फसवणुकीतील हस्तांतरित झालेली तक्रारदाराची रक्कम त्वरित कारवाई करून गोठवली आहे. धर्मेश जयकिशोर व्यास या नवीन म्हाडा लोखंडवाला, अंधेरी येथे राहणाऱ्या तक्रारदाराने ऑनलाईन फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. ओशिवराचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर धनावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार ७ डिसेंबर रोजी पीडित धर्मेश यांना त्यांच्या मोबाईल फोनवर पासपोर्टबद्दल कॉल आला होता. त्या वेळी त्यांना फोन करणाऱ्याने सांगितले की, तुमचा पासपोर्ट तयार आहे; मात्र डिस्पॅच कोड ब्लॉक झाला आहे. तुम्हाला काही रक्कम भरल्यानंतर दोन तासांत पासपोर्ट मिळेल. त्या वेळी धर्मेश चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते म्हणून त्यांनी घाईघाईने कॉलर नंबरवर ऑनलाईन पेमेंट केले. नंतर ९ डिसेंबर रोजी त्यांना एचडीएफसी बँक खात्यातून तब्बल ९९ हजार ९९९ रुपये इतकी रक्कम वळती झाल्याचा मेसेज आला. त्यामुळे धर्मेश यांनी बँकेच्या संबंधित प्राधिकरणाला कळवले की आपण असा कोणताही व्यवहार केलेला नसून, आपली ऑनलाईन फसवणूक झाली आहे. त्यावर बँक व्यवस्थापकाने त्यांना सांगितल्यानुसार ते ओशिवरा पोलिस ठाण्यात गेले. तेथे त्यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली.
--
परराज्यांतील मटार बाजारात
तुर्भे : परराज्यांतून बाजारात मोठ्या प्रमाणात फळभाज्यांची आवक होत आहे. मंगळवारी (ता.१३) पंजाब, अमृतसर, मध्य प्रदेशातून वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीमार्केटमध्ये ३,४५० क्विंटल मटार दाखल झाल्याने किरकोळ बाजारात ४० ते ८० रुपयांना विक्री होत आहे. लांबलेल्या पावसाने भाज्यांची आवक रोडावली होती; आता ती सुरळीत होत असून भाज्यांचे वाढलेले दर पूर्ववत होत आहेत. अशातच बाजारात मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि आपल्या राज्यांतून काही प्रमाणात हिरवा मटार येत आहे. किरकोळ बाजारात मटारचे दर तीस ते चाळीस रुपये किलोवर आले आहेत. कार्तिकी एकादशीनंतर पंजाब, उत्तर प्रदेशमधूनही आवक होणार येणार असल्याने दर आणखी खाली उतरतील, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
महिनाभरापूर्वी १०० रुपयांचा दर मटारची आवक वाढल्याने ३० ते ४० रुपयांवर आले आहेत. मात्र आता बाजारात वाटण्याच्या ३५ ते ४० गाड्या येऊ लागल्या असल्याने मटारचे दर ३० ते ४० रुपये किलो झाले आहेत. त्‍यामुळे गृहिणींकडून समाधान व्यक्‍त होत आहे.
------------
रेल्वेच्या धडकेत एकजण जखमी
नवीन पनवेल : मानसरोवर ते खारघर रेल्वे स्टेशन दरम्याने रेल्वेची धडक लागल्याने एक व्यक्ती जखमी अवस्थेत आढळली होती. त्याच्यावर पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत असून पनवेल पोलिस जखमी व्यक्तीच्या नातेवाइकांचा शोध घेत आहेत. जखमी व्यक्तीचे वय अंदाजे २० वर्षे, उंची पाच फूट सहा इंच, अंगाने मध्यम, चेहरा उभट, नाक सरळ आहे. या व्यक्तीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल रेल्वे पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आर.आर. पाटील यांनी केले आहे. रविवारी महाडजवळ तेजस एक्‍स्‍प्रेसची धडक लागून एकजण जखमी झाल्‍याची घटना घडली होती. उपचारासाठी रुग्‍णालयात दा त्‍याचा मृत्‍यू झाला आहे.
---
‘स्वच्छतेसाठी एक दिवस’
अलिबाग ः शाळांमध्ये डिसेंबर महिन्‍यात श्रमदान व स्वच्छतेसाठी एक दिवस हा उपक्रम अनेक वर्षापासून सुरू आहे. कोरोनामुळे दोन वर्षे उपक्रमाला ब्रेक लागला होता. मात्र यंदा विद्यार्थी मोठ्या उत्‍साहाने उपक्रमात सहभागी होत आहेत.
मोबाईलच्या युगात वावरणारी पिढी घरातून बाहेर पडत नाही. मैदानी खेळात तरबेज नाही, अशी पालकांची कायम ओरड असते. मात्र रायगड जिल्‍ह्यातील बहुतांश शाळांमध्ये श्रमदानाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. श्रमदान करून शाळेचा परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला जात असून यात शिक्षकांसह विद्यार्थी उत्‍स्‍फूर्त सहभाग घेतात. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम सुरू होतात. त्यामध्ये सांस्कृतिक, क्रीडा उपक्रमांसह विद्यार्थ्यांकडून स्वच्छता उपक्रम राबविला जातो.
---
जाहिरातीसाठी झाडांना यातना
जुईनगर ः अलीकडच्या काळात एखादा कार्यक्रम करायचा म्हटलं की जाहिरातबाजी आणि बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात होते. यासाठी अनेकदा झाडांचा वापर केला जात असून खांदेश्वर स्थानक परिसरातील या प्रकारामुळे पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. महापालिका आयुक्तांनी झाडांना खिळे ठोकून जाहिराती, बॅनरबाजी करण्यास सक्त मनाई करत संबंधित व्यक्तींवर कारवाईचे आदेश दिले आहेत; मात्र या नियमांचे उल्लंघन नवी मुंबईतील नेरूळ, बेलापूर, खारघर, कामोठे, खांदेश्वर परिसरात होत आहे. यात नवी मुंबई शहरात सुरू असलेल्या गृहप्रकल्पांची मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्यात येत आहे. खांदेश्वर परिसरातही विविध गृहप्रकल्पांची अशाच प्रकारे जाहिरातबाजी करण्यात आली आहे. यासाठी झाडांना खिळे ठोकण्यात आले असून या प्रकारांकडे प्रशासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे जाहिराबाजी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
-------
बस थांबत नसल्यामुळे गैरसोय
रसायनी : रसायनीहून पावणे दहाच्या सुमारास जाणारी कर्जत-पेण चांभार्ली एसटी बस थांब्यावर थांबत नसल्याने पेणकडे जाणाऱ्या प्रवांशाची गैरसोय होत आहे. कर्जतहून सुटणाऱ्या पेण एसटीला पिल्लई महाविद्यालयात विद्यार्थी तसेच मार्गावरील वावर्ले, चौक आणि इतर गावांतील विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. त्यामुळे येताना एसटी फुल असते. त्यामुळे दांडफाट्यानंतर कांबेपाटी, नवीन रीस, चांभार्ली या ठिकाणी अनेकदा ती थांबवली जात नाही. त्‍यामुळे गुळसुंदे, आपटे आदी गावांतील प्रवाशांची गैरसोय होते.