
जात वैधता प्रमाणपत्रांचे कुडाळ हायस्कूलमध्ये वाटप
68428
कुडाळ ः जात वैधता प्रमाणपत्र वाटप करताना नारायण गंगावणे, राजकिशोर हावळ आदी.
जात वैधता प्रमाणपत्रांचे
कुडाळ हायस्कूलमध्ये वाटप
कुडाळ, ता. १४ ः जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सिंधुदुर्ग यांच्यामार्फत येथील कुडाळ हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये जात वैधता प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणेचे आयुक्त यांच्या निर्देशानुसार नोव्हेंबर ते जानेवारी २०२३ अखेर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सिंधुदुर्ग यांच्यामार्फत मंडणगड योजनेप्रमाणे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव विहित वेळेत दाखल करत नसल्यामुळे बारावी विज्ञान शाखेतील काही विद्यार्थ्यांना सवलतीचे लाभ मिळत नाहीत, ही अडचण विचारात घेऊन तसेच विद्यार्थ्यांचा त्रास कमी होण्याच्या दृष्टीकोनातून या विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. या मोहिमेंतर्गत कुडाळ हायस्कूल कुडाळ व ज्युनिअर कॉलेज येथे समितीच्या पोलिस दक्षता पथकाचे कर्मचारी नारायण गंगावणे यांनी कॉलेजमधील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रांचे वाटप केले. कॉलेजमधील शिक्षण घेणाऱ्या अकरावी, बारावी विज्ञान शाखेतील ज्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव समितीकडे सादर केलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव कॉलेजमार्फत समिती कार्यालयात सादर करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य राजकिशोर हावळ, सहाय्यक शिक्षक अतुल बागवे, अरविंद पाटील, सतीश तवटे आदी उपस्थित होते.