
प्रा. खानोलकरांचा सहवास हे भाग्यच
68438
मळगाव : प्रा. उदय खानोलकर जयंती कार्यक्रमात मनोगत मांडताना संजय पुनाळेकर. व्यासपीठावर मान्यवर.
प्रा. खानोलकरांचा सहवास हे भाग्यच
संजय पुनाळेकर ः प्रा. खानोलकर यांना जयंतीदिनी मळगाव वाचनालयात अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः प्रा. उदय खानोलकरांसारख्या माणसाचा सहवास लाभणे हे मोठे भाग्य होते. त्यांच्यासारखी माणसे पुन्हा पुन्हा होत नाहीत. जगात अनेक बुद्धिवादी प्रज्ञावंत माणसे असतील, मात्र प्रा. खानोलकर हे सर्वांहून वेगळे होते. ते बुद्धिमान होतेच; पण तेवढे लीनही होते. पुस्तक हेच त्यांचे आयुष्य, तर वाचन हाच श्वास होता. मळगाव वाचनालयाला त्यांचे नाव देऊन वाचनालयाचा सन्मान वाढविला आहे, असे प्रतिपादन स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी तथा कलावलय नाट्यसंस्थेचे उपाध्यक्ष संजय पुनाळेकर यांनी केले.
(कै.) प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर, मळगावतर्फे प्रा. उदय खानोलकर यांचा जयंती कार्यक्रम वाचनालयाच्या रमाकांत खानोलकर सभागृहात आयोजित केला होता. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुनाळेकर हे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त जिल्हा कामगार अधिकारी शेखर पाडगावकर, वेंगुर्ले येथील बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आनंद बांदेकर, (कै.) उदय खानोलकर यांचे बंधू महेश खानोलकर, वाचन मंदिरचे अध्यक्ष हेमंत खानोलकर, उपाध्यक्ष बाबली नार्वेकर, सचिव गुरुनाथ नार्वेकर, ग्रंथपाल आनंद देवळी, रवींद्रनाथ कांबळी, ॲड. डी. के. गावकर, प्रा. राजू बांदेकर, चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.
प्रा. खानोलकर यांचे सहकारी प्राध्यापक डॉ. बांदेकर यांनी, उदय म्हणजे ज्ञानाचे व पुस्तकांचे भांडार होता. तासनतास लायब्ररीमध्ये बसून पुस्तक वाचणे हाच त्याचा दिनक्रम होता. रिकाम्या वेळेचा उपयोग तो केवळ आणि केवळ वाचनासाठीच करायचा. केवळ वाचनचेच नव्हे, तर कथा, कादंबरी, साहित्य, कविता यांच्या वाचनानंतर त्यांची समीक्षा कशा करायची हे त्यांच्याकडूनच शिकलो, अशा शब्दांत प्रा. खानोलकर यांच्या स्मृती जागवल्या. तर सोशल माध्यमाच्या जगात युवा वर्गाला वाचनाकडे वळविण्याचे काम खानोलकर वाचन मंदिर प्रामाणिकपणे करीत असून त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची जाईल, अशी ग्वाही महेश खानोलकर यांनी दिली. यावेळी बँक ऑफ इंडियाचे निवृत्त व्यवस्थापक नंदकुमार प्रभूदेसाई, ॲड. डी. के. गावकर, ग्रंथपाल आनंद देवळी, रवींद्रनाथ कांबळी, चंद्रकांत जाधव यांच्यासह अन्य उदयप्रेमींनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष खानोलकर यांनी केले. यावेळी त्यांनी वाचनालयाच्या वाटचालीचा आढावा घेतला. प्रा. राजू बांदेकर यांनी सूत्रसंचालन केले. सचिव नार्वेकर यांनी आभार मानले.
--
मळगाव वाचनमंदिर खानोलकरांचे समाधीस्थान
अध्यक्ष पाडगावकर यांनी प्रा. खानोलकर यांच्या साहित्य क्षेत्रातील कार्याचा गौरव केला. उदय हे मळगावचे भूषण होते. त्यांच्या साहित्यातून त्यांच्या स्मृती येथील चराचरात भरून उरल्या आहेत. ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वरांच्या नावाने आळंदी ओळखली जाते, त्याप्रमाणे साहित्य क्षेत्रात प्रा. खानोलकर यांचे समाधीस्थान म्हणून मळगाव वाचनमंदिर ओळखलं जाईल, अशा भावना पाडगावकर यांनी व्यक्त केल्या.