
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची मोर्चेबांधणी
rat१४२८.txt
(पान २ साठी)
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची मोर्चेबांधणी
राजापूर तालुका ; इच्छुक ग्रामपंचायतीच्या प्रचारात सक्रीय
सकाळ वृत्तसेवा ः
राजापूर, ता. १४ ः तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून त्यापैकी नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतील राजकीय गणिते डोळ्यासमोर ठेवून इच्छुकांकडून ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मोर्चेबांधणी केली जात आहे. या ‘बेरजेच्या राजकारणाची गणिते’ कोणच्या राजकीय पक्षाच्या कोणत्या इच्छुकाला अनुकूल आणि कोणाला प्रतिकूल ठरणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
३१ ग्रामपंचायतीमधील २४९ सदस्यांपैकी १३५ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. सदस्यपदाच्या ९८ जागांसाठी २१० उमेदवार रिंगणामध्ये आपले राजकीय नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीमध्ये विजय संपादन करण्यासाठी उमेदवार, कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रचारयंत्रणा राबवली जात आहे. त्यातून राजकीय धुरळा उडाला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उमेदवारांसह जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील इच्छुक उमेदवारही रिंगणामध्ये उतरल्याचे चित्र दिसत आहेत. आगामी जिल्हा परिषद अन् पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त आपले उमेदवार अन् ग्रामपंचायती निवडून आणण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील इच्छुक उमेदवार प्रयत्नशील आहेत. त्या दृष्टीने त्यांच्याकडून ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बेरजेचे राजकारण करण्यावर भर दिल्याचे दिसत आहे. निवडून येईल तो आपलाच अशीही भूमिका काही इच्छुक उमेदवारांनी घेतल्याचे दिसत आहे. मात्र, हे बेरजेचे राजकारण कोणत्या इच्छुक उमेदवाराला आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुकूल ठरणार आणि कोणाला प्रतिकूल ठरणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.