
अपघात होऊनही लपवाछपवी का?
68484
कणकवली : येथील शिवसेना कार्यालयातील पत्रकार परिषदेत बोलताना नगरसेवक सुशांत नाईक. शेजारी कन्हैया पारकर, सुजित जाधव आदी.
कणकवलीतील अपघात लपवता का?
सुशांत नाईक : रविंद्रनाथ मुसळे मृत्यूप्रकरणी नगराध्यक्षांनी भूमिका स्पष्ट करावी
कणकवली, ता.१४ : कणकवली-कनेडी राज्यमार्गावरील रेल्वे स्टेशनलगत झालेल्या अपघातात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रवींद्रनाथ मुसळे यांचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी नगराध्यक्षांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी भूमिका आज नगरपंचायत विरोधी पक्षगटनेते सुशांत नाईक यांनी मांडली.
येथील शिवसेना कार्यालयात श्री.नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगरसेवक कन्हैया पारकर, नगरसेवक रुपेश नार्वेकर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुजित जाधव, माजी नगरसेवक उमेश वाळके, सचिन सावंत, महेश कोदे, वंचित आघाडीचे रोहन कदम आदी उपस्थित होते.
श्री.नाईक म्हणाले, रेल्वे स्टेशन परिसरात नगरपंचायतीने गटार खुदाईचे काम सुरू केले; मात्र कोणतीही सुरक्षात्मक उपाययोजना केली नाही. त्यामुळे रवींदनाथ मुसळे हे दुचाकीसह १२ फुट खोल खड्ड्यात कोसळले. त्यानंतर त्यांना बाहेर काढून रूग्णालयात नेण्यात आले. त्यांची दुचाकीही तातडीने बाहेर काढण्यात आली. या सर्व बाबी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत. त्यामुळे प्रथमदर्शनी ठेकेदार आणि नगरपंचायत प्रशासन यांचा गलथानपणा समोर आला आहे. मात्र याबाबत कणकवली नगराध्यक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे ते ठेकेदाराला पाठिशी घालताहेत का असा प्रश्न निर्माण होत आहे.
नगरसेवक कन्हैया पारकर म्हणाले, रवींद्रनाथ मुसळे यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्याने झाला असा डॉक्टरांचा अहवाल आहे; मात्र आदल्या दिवशी सायंकाळी दुचाकीसह खड्ड्यात पडल्याने मुसळे यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. तो धक्का सहन न झाल्यानेच त्यांचे निधन झाले. या प्रकरणी नगरपंचायत प्रशासनाने आपली चूक मान्य करून मुसळे यांच्या परिवाराला आर्थिक भरपाई देणे गरजेचे होते. परंतु अपघाताच्या या प्रकाराबाबत लपवाछपवी का केली जात आहे हा आमचा सवाल आहे.
---
खोदकाम विनापरवाना ः पारकर
श्री.पारकर म्हणाले, ‘‘ड्रेनेज लाईनसाठी खोदण्यात आलेला राज्य मार्ग हा सार्वजनिक बांधकामच्या अखत्यारीत आहे; मात्र रस्ता खुदाई करताना बांधकामची कोणतीही परवागनी घेण्यात आली नाही. बांधकाम विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचेही पालन करण्यात आले नाही. तसेच बांधकामच्या अटी शर्तीचेही पालन करण्यात आले नाही. या प्रकारात ठेकेदार आणि नगरपंचायत प्रशासनही जबाबदार असून यातील दोषींवर गुन्हा दाखल व्हायला हवा.’’