Abdul Sattar : शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाय सुचवावेत; कृषिमंत्री अब्दुल सत्तार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abdul Sattar
दाभोळ-शेतकर्‍यांच्या समस्यांवर शास्त्रज्ञांनी उपाय सुचवावेत

Abdul Sattar : शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाय सुचवावेत; कृषिमंत्री अब्दुल सत्तार

दाभोळ : शेतकऱ्‍यांच्या कृषी विद्यापीठाकडून बऱ्‍याच अपेक्षा असल्याने त्यांना भेडसावणाऱ्‍या समस्यांवर शास्त्रज्ञांनी उपाययोजना सुचवल्यास त्यावर त्वरित अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकार नक्की घेईल. म्हणून कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्‍यांच्या सक्षमीकरणाचा ध्यास घ्यावा, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रति कुलपती अब्दुल सत्तार यांनी बुधवारी (ता. १४) येथे केले. कृषी विद्यापीठे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५० व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती बैठकीच्या उद्‍घाटन समारंभात ते बोलत होते. या वेळी राज्याच्या कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव एकनाथ डवले, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणेचे महासंचालक रावसाहेब भागडे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी, डॉ. पंजाबराव देषमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख होते.

अब्दुल सत्तार म्हणाले, ‘‘मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार राज्यात काजू फळपीक विकास योजना लागू होणार असून, त्याचा फायदा कोकणातील शेतकऱ्‍यांना होणार आहे. विद्यापीठे फक्त पैसे खर्च करण्याचे केंद्र असल्याचा समज चुकीचा असून, चारही कृषी विद्यापीठांनी केलेले कार्य प्रशंसनीय आहे. विविध पिकांचे अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतकऱ्‍यांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे, विविध बँकांनी शेतकऱ्‍यांच्या मागणीप्रमाणे त्यांना कर्ज वितरित करावे, तसेच शेतकऱ्‍यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य भाव मिळण्याची व्यवस्था संबंधित विभागाने करावी.’’ चारही कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्‍यांनी आपण एकाच कुटुंबांचे सदस्य आहोत, असे समजून काम करण्याची मानसिकता जोपासल्यास महाराष्ट्रातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, तसेच शेतकऱ्‍यांचे दारिद्र्य दूर झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मंत्री सत्तार यांनी व्यक्त केला. बैठकीला चारही कृषी विद्यापीठांतील संचालक, विविध विभागांचे प्रमुख, विविध विद्याशाखांचे एकूण ३४८ ज्येष्ठ शास्त्रज्ञ उपस्थित होते.

रिक्त पदे १०० दिवसांत भरणार
कृषी क्षेत्रात उल्लेखनीय संशोधन करणाऱ्‍या तसेच शेतकऱ्‍यांसाठी राबणाऱ्‍या शास्त्रज्ञांचा सन्मान करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आणि त्याची अंमलबजावणी या कार्यक्रमात केली आहे. कृषी विद्यापीठातील सर्व रिक्त जागा भरण्याची मागणी केली असून, पहिल्या टप्प्यात सर्व विभागांतील ७५ हजार अधिकारी/कर्मचारी १०० दिवसांत भरण्याचा क्रांतिकारी निर्णय सरकारने घेतल्याचे सत्तार यांनी सांगितले.

कृषी विद्यापीठे सोन्याची अंडी देणारी कोंबडी
‘कृषी विद्यापीठ म्हणजे पांढरे हत्ती’, हा समज चुकीचा असून, चारही कृषी विद्यापीठांनी मांडलेल्या प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलला मी दोन-अडीच तासांत भेट देऊन पाहणी केल्यावर कृषी विद्यापीठे ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, असे जाणवल्याचे गौरवोद्‍गार सत्तार यांनी काढले.