
रत्नागिरी जिल्ह्याला सर्वसाधारण विजेतेपद
rat१५२९. txt
(टुडे पान २ साठी)
रत्नागिरी जिल्ह्याला सर्वसाधारण विजेतेपद
महसूल क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धा ; स्वरदा खातू उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट नृत्याचा किताब प्रमोद बोरसे
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. १५ः कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा नुकत्याच उत्साही वातावरणात झाल्या. रत्नागिरीच्या महसूल विभागाने क्रीडाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमात वेगळा ठसा उमटवला. मूकनाट्याबरोबरच महिला आणि पुरुष कर्मचारी यांनी एकत्रित सादर केलेल्या जोगवाने विशेष लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेत अव्वल स्थान राखत रत्नागिरी जिल्ह्याला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले आहे. कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२२चे आयोजन चेंबूर येथील मैदानावर झाल्या.
मुंबई उपनगरकडे या स्पर्धांचे यजमानपद होते. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यात कोकण विभागातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर या सात जिल्ह्यांचा समावेश होता. रत्नागिरी महसूल विभागातील सुमारे १२५ कर्मचारी या स्पर्धेतील क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. सांस्कृतिक कार्यक्रमात रत्नागिरीच्या महसूल कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम सादरीकरणात स्वतंत्र ठसा उमटवला. सर्वसाधरण विजेतेपदाचा बहुमान चुरशीने मिळवला. रत्नागिरी विभागातील स्वरदा खातू उत्कृष्ट गायक ठरल्या, तर उत्कृष्ट नृत्याचा किताब रत्नागिरीच्या प्रमोद बोरसे यांना मिळाला.
नृत्याला दाद..
जोगवा चित्रपटातील नृत्यावर महिला आणि पुरुषांनी स्त्री वेशातील सादर केलेल्या नृत्याला विशेष दाद मिळाली. मूकनाट्यानेही विशेष दखल घ्यायला लावली. इतरही कर्मचाऱ्यांनी समूहनृत्य, एकल नृत्य, गायन यात सहभाग घेतला होता. या सर्व कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी विशेष कौतुक केले.