
केळुसकरांच्या कथा ''एकापेक्षा एक''
swt152.jpg
68630
वेंगुर्लेः ''एकापेक्षा एक'' कथासंग्रह प्रकाशन प्रसंगी अरुण दाभोलकर, आनंद बांदेकर, वृंदा कांबळी, प्रदीप केळुस्कर, सचिन परुळकर आदी.
केळुसकरांच्या कथा ‘एकापेक्षा एक’
अरुण दाभोलकरः वेंगुर्लेत पुस्तक प्रकाशन सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १५ः प्रदीप केळुसकर यांच्या कथा कोकणी मातीतल्या आणि दर्जेदार आहेत. त्यांच्यासारख्या नाटकात रमणाऱ्या व्यक्तीने एवढ्या दर्जेदार कथा लिहायला एवढा उशीर का लावला, याचे आश्चर्य वाटते, असे प्रतिपादन चित्रकार अरुण दाभोलकर यानी वेंगुर्ले खर्डेकर कॉलेज येथे आनंदयात्री ग्रुपतर्फे आयोजित केळुसकर यांच्या ‘एकापेक्षा एक’ या कथासंग्रहाच्या प्रकाशन समारंभ कार्यक्रमात केले.
आनंदयात्री ग्रुप वेंगुर्ले आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. पांडुरंग कोलौपूरे होते. व्यासपीठावर चित्रकार दाभोलकर, आनंदयात्री ग्रुपच्या अध्यक्षा वृंदा कांबळी, उपाध्यक्ष आनंद बांदेकर, लेखक प्रदीप केळुसकर, साहित्यिक व इतर विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना दाभोलकर म्हणाले, "केळुसकर यांच्या कथा, नाटकातील पडद्यामागील नाटक, डॉक्टर आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यांच्यातील संबंध, लहानपणापासून ते आयुष्याच्या अखेरपर्यंतची मैत्री व्यक्त न झाल्याने अपुरे राहिलेले प्रेम, संभाजीच्या रंगभूमीवर भूमिका करणाऱ्या नट या व अशा अनेकांची आयुष्ये आपल्यासमोर ठेवतात. एवढ्या दर्जेदार कथांची छपाई आणि हे लिखाण एखाद्या चांगल्या प्रकाशकाकडे गेली असती तर पुस्तकाचे सोने झाले असते; पण आपल्या छोट्या गावात आपण याबाबतीत कमी पडतो आणि लोकांपर्यंत पोहोचत नाही, ही खंत आहे." यावेळी दाभोलकर यांनी केळुसकरांच्या पुस्तकासाठी चांगला प्रकाशक मिळवून देण्याचे आश्वासन दिले. लेखक केळुसकर यांनी कोल्हापुरात असताना पाट पंचक्रोशीमधील नाट्यकलावंताना एकत्र जमवून नाट्यग्रुप तयार करत गावागावांत नाटक पोहोचवले. काही वर्षानंतर नाटक थांबले; पण कोरोना काळात व्यवसायासाठी खूपच वेळ मिळाला. त्यानंतर हा चौदा कथांचा संग्रह ''एकापेक्षा एक'' नावाने प्रकाशित झाला, असे सांगितले. लेखिका वृंदा कांबळी यांनी कथा लिहिणे सोपे नाही, त्यासाठी दर्जेदार निरीक्षणशक्ती हवी, बीज सापडल्यानंतर कथा फुलविण्याची क्षमता हवी, असे सांगितले. नवीन पिढीने कथा लेखन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. प्राजक्ता आपटे यानी केळुसकरांच्या कथासंग्रहातील सर्व कथांची ओळख करून दिली. लेखक केळुसकरांच्या मातोश्री पाट माजी सरपंच माई केळुसकर यांचा ''आनंदयात्री''तर्फे सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सचिव सचिन परुळकर यांनी केले.