
यूथ फोरम देवगडचे ''निर्वासित'' प्रथम
यूथ फोरम देवगडचे ‘निर्वासित’ प्रथम
हौशी मराठी नाट्य स्पर्धाः ‘बझर’ द्वितीय, २५ नाट्यप्रयोग सादर
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १५ : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी केंद्रावर घेण्यात आलेल्या ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत यूथ फोरम, देवगड या संस्थेच्या ''निर्वासित'' या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मालवण या संस्थेच्या ''बझर'' या नाटकाने द्वितीय, तर स्वराध्या फाऊंडेशन, मालवण संस्थेच्या ''श्याम तुझी आवस इली रे'' नाटकाने तृतीय क्रमांक मिळविला. या तिन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरी मालवण, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी केंद्रांवरील अन्य निकाल अनुक्रमे असाः दिग्दर्शन-स्वप्नील जाधव (निर्वासित), अभय कदम (बझर), प्रकाश योजना-श्याम चव्हाण (निर्वासित), श्याम चव्हाण (बझर), नेपथ्य-अभय वालावलकर (बत्ताशी), सचिन गावकर (निर्वासित), रंगभूषा-सावानी पराडकर (संकासूरा हे महावीरा), आदिती दळवी (बत्ताशी १९४७). उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक विजेते-प्रफुल्ल घाग (निर्वासित) व शुभदा टिकम (बझर), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र-प्राजक्ता वाडये (भिंती), योगिता सावंत (श्याम तुझी आवस ईली रे), कीर्ती चव्हाण (या व्याकुळ संध्यासमयी), भाग्यश्री पाणे (ए आपण चहा घ्यायचा का?), सीमा मराठे (ऋणानुबंध), योगेश जळवी (मधुमाया), प्रसाद करंगुटकर (खरं सांगायचं तर), प्रसाद खानोलकर (पासर-पॉन), कृष्णकांत साळवी (मावळतीचा इंद्रधनू), दीपक माणगावकर (मडवॉक). येथील मामा वरेरकर नाट्यगृह व स्वा. विनायक दामोदर सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे १५ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत झालेल्या या स्पर्धेत एकूण २५ प्रयोग सादर करण्यात आले. परीक्षक म्हणून सतीश शेंडे, मानसी राणे, ईश्वर जगताप यांनी काम पाहिले. सर्व विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले.