भाजप विरोधात सर्वपक्षीय एकवटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप विरोधात सर्वपक्षीय एकवटले
भाजप विरोधात सर्वपक्षीय एकवटले

भाजप विरोधात सर्वपक्षीय एकवटले

sakal_logo
By

swt1517.jpg
L68689
बांदाः भाजप पुरस्कृत सरपंचपदाच्या उमेदवार प्रियांका नाईक व इतर उमेदवार प्रचारादरम्यान.
swt1518.jpg
68690
बांदाः गाव विकास पॅनेलच्या सरपंचपदाच्या उमेदवार अर्चना पांगम व इतर उमेदवार प्रचार करताना. (छायाचित्रेः नीलेश मोरजकर)

भाजप विरोधात सर्वपक्षीय एकवटले
बांदा ग्रामपंचायतः प्रियांका नाईक, अर्चना पांगम यांच्यात थेट लढत
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १५ः ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून बांद्यात भाजपची सलग २५ वर्षांची सत्ता मोडीत काढण्यासाठी सर्वपक्षीय एकवटले आहेत. भाजप पुरस्कृत बांदा नागरी विकास आघाडीच्या सरपंचपदाच्या उमेदवार प्रियांका नाईक यांच्यासमोर सर्वपक्षीय गाव विकास पॅनेलच्या उमेदवार अर्चना पांगम यांनी आव्हान उभे केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष असलेल्या बांदा ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. एकूण १५ जागांपैकी प्रभाग क्रमांक ४ मधील भाजपचे शामसुंदर मांजरेकर हे बिनविरोध निवडून गेल्याने १४ जागांसाठी निवडणूक होणार आहे. रविवारी मतदान होणार असल्याने सर्वच उमेदवार मतदारांचे उंबरे झिजवितानाचे चित्र आहे. पक्षीय पातळीवर बघितल्यास बांद्यात भाजपचे वर्चस्व आहे. गेली २५ वर्षे ग्रामपंचायतीत भाजपची निर्विवाद सत्ता आहे. सरपंच पदासाठी महिला आरक्षण असल्याने भाजपने अभ्यासू, हुशार व प्रशासनाचा अनुभव असलेल्या व बांद्याच्या माजी सरपंच राहिलेल्या प्रियांका नाईक यांना रिंगणात उतरविले आहे. त्यांच्याविरोधात सर्वपक्षियांनी एकत्रित येत माजी जिल्हा परिषद सदस्या राहिलेल्या व निवडणुकांचा दीर्घ अनुभव असलेल्या अर्चना पांगम यांना मैदानात उतरविले आहे. यामुळे या ठिकाणी तुल्यबळ लढत पाहावयास मिळणार आहे. मागील सरपंचपद पोटनिवडणुकीत भाजपचे अक्रम खान यांनी शिवसेनेचे उमेदवार मकरंद तोरसकर यांचा तब्बल ८१३ मतांनी पराभव केला होता. दरम्यानच्या कालावधीत मतदार संख्येत देखील वाढ झाली आहे. त्यामुळे मताधिक्य भरून काढण्याचे मोठे आव्हान पांगम यांच्यासमोर असेल. शहरातील पाचही प्रभागात भाजपची ताकद आहे. त्यामुळे भाजपला निवडणूक सोपी जाण्याचा अंदाज आहे.
शिवसेनेची ताकद शहरात आहे. त्या तुलनेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व नगण्य असल्याने शिवसेनेला अधिक मेहनत घ्यावी लागेल. सद्यस्थितीत सर्वच उमेदवार प्रचारात मग्न असून उमेदवारांनी घराघरात पोहोचण्यावर अधिक भर दिला आहे. सर्वच प्रभागात लक्षवेधी लढती होत असून मंगळवारी (ता. २०) निकालानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.