
निवासी शिबिराचा पणदूर येथे शुभारंभ
swt165.jpg
68853
पणदूरः रणजित देसाई यांचे स्वागत करताना डॉ. झोडगे. सोबत दादा साईल, संदीप परब. (छायाचित्रः अजय सावंत)
निवासी शिबिराचा
पणदूर येथे प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता.१६ः राष्ट्रीय सेवा योजना विभाग, संत राऊळ महाराज महाविद्यालय आणि संविता आश्रम, पणदूर यांच्यावतीने आयोजित सात दिवसीय विशेष निवासी शिबिराचा प्रारंभ पणदूर येथे संविता आश्रम येथे झाला.
‘युवा ध्यास : ग्राम शहर विकास’ या संकल्पनेवर आधारित या निवासी शिबिरामध्ये २० डिसेंबरपर्यंत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. याचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी, निवासी शिबिर हा ग्रामीण जीवनाच्या मूलभूत समस्या जाणून घेण्याचा एक अभिनव उपक्रम असल्याचे सांगितले.
उद्घाटनाचे अध्यक्षपद महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही. बी. झोडगे यांनी भूषविले. शिबिर यशस्वी करण्यासाठी विद्यार्थांनी सकारात्मक योगदान द्यावे, असे त्यांनी विद्यार्थांना आवाहन केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम संयोजक प्रा. उमेश कामत यांनी प्रास्ताविकातून निवासी शिबिराची उद्दिष्टे स्पष्ट केली. या शिबिरातून स्वच्छ भारत, जलसंधारण, स्त्री-सक्षमीकरण, युवा आरोग्य, लोकशाही मूल्ये, नैतृत्व गुण, ग्रामीण लघु उद्योग व व्यक्तिमत्व विकास अशा संदर्भात विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे सांगितले. या शिबिरात अनेक तज्ञ व्यक्ती व मान्यवर यांची व्याख्याने आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. कमलाकर चव्हाण यांनी केले. उद्घाटन समारंभास संविता आश्रमचे अध्यक्ष संदीप परब, तंटामुक्ती समिती पणदूरचे अध्यक्ष चंद्रकांत साईल, पोलीस पाटील देवू सावंत, जीवन आनंद संस्था विश्वस्त जितेंद्र परब, संविता आश्रमचे जनसंपर्क अधिकारी महाबळेश्वर कामत, उप-व्यवस्थापक आशिष कांबळी, राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्राध्यापक, आश्रमचे कर्मचारी व ग्रामस्थ हे उपस्थित होते.