श्रीदैव भैरी मंदिराचा क गटात समावेश व्हावा; मुख्यमंत्र्यांना निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीदैव भैरी मंदिराचा क गटात समावेश व्हावा; मुख्यमंत्र्यांना निवेदन
भैरी देवस्थान

श्रीदैव भैरी मंदिराचा क गटात समावेश व्हावा; मुख्यमंत्र्यांना निवेदन

देवस्थानची मागणी ; मुख्यमंत्र्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी : रत्नागिरीचे ग्रामदैवत श्रीदेव भैरी मंदिर हे भक्ती परंपरेतील एक आदर्श श्रद्धास्थान असलेले चारशे वर्षापूर्वीचे पुरातन जागृत देवस्थान आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या मंदिराला राज्यशासनाच्या मंदिर वारसा दर्जा यादीमध्ये क गटात समावेश व्हावा, अशी मागणी देवस्थानतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आज करण्यात आली. श्री देव भैरी, जोगेश्वरी, नवलाई, पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र तथा मुन्नाशेठ सुर्वे यांनी या संदर्भातले निवेदन दिले.
ग्रामदैवत श्री भैरी मंदिराला भेट देऊन श्री भैरीचरणी नतमस्तक होणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिले मुख्यमंत्री ठरले. आज दुपारी त्यांनी रत्नागिरीत पोहोचल्यावर राष्ट्रपुरूषांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. त्यानंतर खालच्या आळीतील ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिराला भेट दिली. या मंदिरात पोहोचल्यानंतर दर्शन घेतले. यासाठी जंगी स्वागताची तयारी करण्यात आली होती. याबद्दल सुर्वे यांनी सांगितले, मुख्यमंत्री शिंदे यांनी भरगच्च शासकीय कार्यक्रम असूनही सर्वप्रथम श्रीदेव भैरी मंदिरात दर्शनासाठी आले. या मंदिराचा कारभार रत्नागिरी शहरातील बारा वाड्यांच्या सहभागाने उत्तमप्रकारे चालू आहे. भविष्यातील मंदिर समितीची वाटचाल आणि श्रीदेव भैरी मंदिराच्या प्रांगणात, मंदिरात होणारे सर्व सण-उत्सव त्या निमित्ताने सांस्कृतिक उपक्रम सुरू आहेत. या मंदिराला प्राचीन वारसा आहे. संस्कृती, इतिहास आहे. त्यामुळे या मंदिराला वारसा क दर्जा मिळाला.
या प्रसंगी उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, मंत्री दीपक केसरकर, दूरदर्शनचे निवृत्त अधिकारी जयू भाटकर, भैरी देवस्थाचे उपाध्यक्ष लीलाधर जोशी, सदस्य जितेंद्र भोंगले, विकास मयेकर, विजय खेडेकर, प्रकाश घुडे, अमर विलणकर, अमित विलणकर, चंद्रकांत गावखडकर, राजेंद्र फगरे, खजिनदार अभिजित गुरव, कार्यवाह महादेव अकिवाटे यांच्यासमवेत ग्रामस्थ, गुरव मंडळी आदी उपस्थित होते.


शिमगोत्सवाला येण्याचे आमंत्रण
मुख्यमंत्री शिंदे यांना शिमगोत्सवाचेही निमंत्रण देण्यात आले. कोकणात दरवर्षी होणारा शिमगा उत्सव हे भारतीय लोकसंस्कृतीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. रत्नागिरी जिल्ह्यात श्रीदेव भैरीचा शिमगोत्सव, पालखी उत्सव ही तमाम कोकणवासियांना आनंद पर्वणी आहे. यंदा श्रीदेव भैरीचा शिमगोत्सव ६ मार्च २०२३ या दिवशी होणार आहे. या शिमगोत्सवात आपण उपस्थित राहावे, असे निमंत्रणही या वेळी देण्यात आले.

टॅग्स :Ratnagiri