मालवणात भाजप-ठाकरे शिवसेनेत चुरश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणात भाजप-ठाकरे शिवसेनेत चुरश
मालवणात भाजप-ठाकरे शिवसेनेत चुरश

मालवणात भाजप-ठाकरे शिवसेनेत चुरश

sakal_logo
By

मालवणात भाजप-ठाकरे शिवसेनेत चुरस
प्रचाराची सांगताः तरूण उमेदवारांचा लक्षवेधी सहभाग
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १६ः तालुक्यात येत्या १८ तारखेला होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचारास वेग आला असून आज सायंकाळी या प्रचाराची सांगता झाली. तालुक्यात भाजप आणि ठाकरे शिवसेना यांच्यातच चुरशीची लढत होत असून दोन्ही पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
तालुक्यात बर्‍याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका या गाव पॅनेलच्या माध्यमातून होत असून यात सर्वपक्षीयांचे उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यावेळच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे तरूण उमेदवारांनी राजकारणात उडी मारली आहे. सर्वांधिक ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखण्याचा चंग भाजपने बांधला आहे तर भाजपचे वर्चस्व मोडीत काढत अनेक ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी ठाकरे शिवसेनेने कंबर कसली आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार? याचे चित्र २० तारखेलाच स्पष्ट होणार आहे. तालुक्यातील ५५ पैकी ९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. बांदिवडे खुर्द कोईल ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाचा उमेदवारच नसल्याने या ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त राहिले आहे. त्यामुळे तालुक्यात ४५ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. तालुक्यातील असगणी, पळसंब, शिरवंडे, साळेल, आंबडोस, काळसे, घुमडे, कातवड, आनंदव्हाळ-कर्लाचाव्हाळ या ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. तर ४५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी निवडणुका होत आहेत. तर सदस्य पदासाठी ६९८ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. तालुक्यातील तोंडवळी, वायंगणी, त्रिंबक, बांदिवडे, वायरी भुतनाथ, देवबाग, हडी, रामगड, कोळंब, सर्जेकोट-मिर्याबांद, कांदळगाव, रेवंडी, पोईप, वडाचापाट, सुकळवाड, नांदोस, तळगाव, वरची गुरामनगरी, आंबेरी, देवली, चौके, कुंभारमाठ, तारकर्ली-काळेथर या ग्रामपंचायतीच्या निवडणूका भाजप, ठाकरे शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार यांनी येथे ठाण मांडत गावागावात जात आढावा घेत कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले आहे. अनेक ठिकाणी त्यांनी ठाकरे शिवसेनेला धक्का देत महत्त्वाच्या पदाधिकार्‍यांचा भाजपात प्रवेश करून घेतला आहे. त्यामुळे याचा फटका ठाकरे शिवसेनेला बसण्याची चिन्हे आहेत. आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी यांच्यासह अन्य ठाकरे सेनेच्या पदाधिकार्‍यांनीही गावागावात प्रचाराच्या पार्श्‍वभूमीवर भेटी देत कार्यकर्त्यांना, उमेदवारांमध्ये नवचैतन्य निर्माण करत भाजपसमोर कडवे आव्हान निर्माण केले आहे. दोन्ही पक्षांनी यावेळी तरूण उमेदवारांना संधी दिली आहे. त्यामुळे त्या त्या उमेदवारांचा गावातील सामाजिक कार्यात असलेला सहभाग, काम करण्याची इच्छा, त्याची गावातील प्रतिमा यावरच त्या-त्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. भाजप आणि ठाकरे शिवसेना गटाकडून तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर आपलेच वर्चस्व असेल असा दावा केला जात आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये जनतेचा कौल कोणाच्या बाजूने राहतो? यावरच राजकीय पक्षांचे भवितव्य दिसून येणार आहे.
---------
चौकट
राजकिय चित्र
तालुक्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या बंडखोरीचा फटका भाजपला बसणार असण्याची चिन्हे आहेत. याठिकाणी संबंधित उमेदवाराला ठाकरे शिवसेना गटाने पाठिंबा दिला आहे. काही ग्रामपंचायतीच्या ठिकाणी ऐन प्रचारात ठाकरे शिवसेनेतील पदाधिकार्‍यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने याचा फटका ठाकरे शिवसेनेला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
---------
चौकट
विकासात्मक मुद्द्यांवर भर
निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर उमेदवारांनी घरोघरी प्रचारावर भर देताना गावचा सर्वांगिण विकास, पर्यटनाच्या माध्यमातून विकास, अन्य पायाभूत सुविधा यांवर जास्त भर दिल्याचे दिसून आले. एकंदरीत ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये कोणाचे वर्चस्व राहते? यावरून येत्या काळात होणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
------------