वैभववाडीत पाच ठिकाणी सर्वाधिक चुरस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैभववाडीत पाच ठिकाणी सर्वाधिक चुरस
वैभववाडीत पाच ठिकाणी सर्वाधिक चुरस

वैभववाडीत पाच ठिकाणी सर्वाधिक चुरस

sakal_logo
By

वैभववाडीत पाच ठिकाणी सर्वाधिक चुरस
ग्रामपंचायत निवडणूक; घरोघरी प्रचार, मतदारांशी थेट संवादावर ठेवला जातोय भर
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १६ ः सभा, बैठकांपेक्षा ग्रामपंचायत निवडणुकीत घरोघरी प्रचार आणि थेट मतदारांशी संवादावर भर देण्यात आला असून तालुकास्तरावरील लोकप्रतिनिधींनी प्रचारात सहभाग घेतल्याचे चित्र तालुक्यात सर्वत्र पाहायला मिळाले. तालुक्यातील ११ पैकी पाच ग्रामपंचायतीमध्ये प्रचंड चुरशीचे वातावरण आहे.
तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीपैकी ६ ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित ११ ग्रामपंचायतीसाठी रविवारी (ता. १८) मतदान होणार आहे. ११ सरपंचपदांसाठी ३८ उमेदवार तर ४८ सदस्यांसाठी ९६ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीत पक्षीय चिन्हाचा वापर नसला तरी ही निवडणूक पूर्णपणे पक्षीय पातळीवर होत आहे. भाजप, ठाकरे शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना आणि काही ठिकाणी काँग्रेसने या निवडणुकीत उमेदवार उभे केले आहेत. पक्षीय पातळीवर निवडणूक होत असल्यामुळे सुरुवातीपासूनच प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. विरोधकांना उमेदवारच मिळू नये, यापासून ते निवडणूक झाली तर आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून येतील, अशी रणनीती पक्षांकडून आखली गेली. सहा ग्रामपंचायतीची झालेली बिनविरोध निवडणूक तालुका पातळीवरून झालेल्या मध्यस्थीचाच परिपाक मानला जात आहे. प्रत्येकाची समजूत काढून आणि अन्य काही पदाचे पालपुद पुढे करून काही ठिकाणी निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. ७ डिसेंबरला उमेदवारांना चिन्ह मिळाल्यापासून खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. या वेळी थेट सरपंच निवडणूक असल्यामुळे राजकीय पक्षांनी सरपंचपदावरच अधिक फोकस केला. सदस्य पदाच्या निवडणुकीत तितकाचा रस कुठल्याच राजकीय पक्षांना राहिलेला नाही. त्यामुळे सदस्य बिनविरोध होण्याचे प्रमाण या निवडणुकीत लक्षणीय राहिले आहे. सुरुवातीला वाडीवार बैठका, गावातील विविध ग्रुपशी संवाद करून त्यांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी प्रयत्न करणे, अशा प्रकारे प्रचार सुरू होता. त्यानंतर जिथे जिथे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्याची ताकद कमी पडू लागली, तिथे-तिथे तालुका पातळीवर काम करणारे राजकीय पदाधिकारी जाऊ लागले. पक्षांतर्गंत धुसफूस असेल तर वरिष्ठांशी संभाषण करून देणे, वेगळ्या पदाची जबाबदारी देण्याचे आश्वासन देणे असे प्रकार सुरू झाले; परंतु गेल्या चार-पाच दिवसांत प्रचार शिगेला पोहोचला आहे. घरोघरी प्रचारावर अधिक भर सर्वच उमेदवारांचा दिसून येत आहे. सभा, बैठकांना पूर्णविरामच दिला. उंबर्डे, कोळपे येथे भाजप आणि ठाकरे शिवसेनेच्या एक दोन सभा वगळता अन्यत्र कुठेही सभा झालेल्या नाहीत. मात्र, या निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभावी वापर झाला आहे.


असे आहे चित्र
तालुक्यातील उंबर्डे, कोळपे, नापणे ग्रामपंचायतीमध्ये भाजप आणि ठाकरे शिवसेनेत काटे की टक्कर दिसून येत आहे. करूळ ग्रामपंचायतीमध्ये भाजप विरुद्ध मनसेमध्ये लढत रंगत आहे. नावळेमध्ये भाजपचे दोन उमेदवार रिंगणात असून बाळासाहेबांच्या शिवसेनेचा उमेदवार देखील मैदानात आहे. त्यामुळे येथे तिरंगी लढत आहे. हेत ग्रामपंचायतीमध्ये भाजपच्या दोन उमेदवारांमध्ये थेट लढत होत आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.


जिंकेल तो आमचाच
हेत, उंबर्डे, नावळे, तिरवडे तर्फे खारेपाटण या चार ग्रामपंचायतीमध्ये भाजपाच्या उमेदवारांमध्ये सरपंचपदासाठी निवडणुक होत आहे. याशिवाय अन्य पक्षाचे उमेदवार तेथे आहेत. परंतु, निवडणुकीत उतरलेला भाजपाचा प्रत्येक उमेदवार आपण भाजपचाच म्हणून सांगत असल्यामुळे भाजपचे पदाधिकारीदेखील जो जिंकेल, तो आमचाच आहे, असे सांगत आहेत.