ग्रामपंचायतीसाठीच्या प्रचार तोफा थंडावल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामपंचायतीसाठीच्या प्रचार तोफा थंडावल्या
ग्रामपंचायतीसाठीच्या प्रचार तोफा थंडावल्या

ग्रामपंचायतीसाठीच्या प्रचार तोफा थंडावल्या

sakal_logo
By

ग्रामपंचायतीसाठीच्या प्रचार तोफा थंडावल्या
मतदार भेटींसाठी धावपळ; छुप्या प्रचारासाठी सगळेच सरसावले
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १६ ः जिल्ह्यात ३२५ पैकी ३२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्याने २९३ गावातील निवडणुकीसाठी रविवारी (ता. १८) मतदान होत आहे. त्यासाठीच्या गावागावांतील उमेदवारांच्या जाहीर प्रचार तोफा आज सायंकाळी थंडावल्या. आता छुप्या प्रचारासाठी उमेदवार आणि कार्यकर्ते यांची धावपळ उडाली आहे.
जिल्ह्यातील २९३ सरपंचपदांसाठी ७९० उमेदवार ताकद पणाला लावत आहेत. एकूण २५५१ ग्रामपंचायत सदस्यपदासाठी ४६४९ एवढे उमेदवार मेहनत घेत आहेत. जिल्ह्यात २१९ सदस्य बिनविरोध ठरले आहेत. दरम्यान ९३३ मतदान केंद्रे निश्‍चिती झाली आहे. तेथे १०६४ मतदान यंत्रे सज्ज ठेवली जाणार आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत होण्यासाठी पोलिस प्रशासनाने नियोजन केले असून दीड हजार पोलिस बंदोबस्तासाठी सज्ज आहेत. भरारी पथकांचीही नियुक्ती केली आहे.
यंदाच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत थेट लढत आहे. भाजपने काही ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाशी युती केली आहे. तर शिवसेना ठाकरे गटासोबत वंचित आघाडी तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष आहेत. पुरस्कृत उमेदवारही भाजप पुरस्कृत उमेदवारांविरोधात लढत देत आहेत. काही ग्रामपंचातींमध्ये अपक्ष असल्याने तिरंगी लढतींचे चित्र आहे. शिवसेनेने अनेक गावांमध्ये गाव विकास पॅनेलच्या माध्यमातून आपले उमेदवार उभे केले आहेत. भाजपने समर्थ विकास पॅनेल तसेच त्या त्या गावातील देवस्थाने, मंडळे यांच्य नावे पॅनेल तयार केली आहे.
शिवसेनेने ताकद लावली असली तरी शिवसेनेची वरिष्ठ नेतेमंडळी एकत्रितपणे प्रचाराला फिरताना दिसून आलेली नाही. या उलट आमदार नीतेश राणे यांनी सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली असून तालुकानिहाय तसेच गावनिहाय प्रचार यंत्रणेची धुरा भाजपमधील पदाधिकाऱ्‍यांवर सोपवली आहे. पुढील काळात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. याखेरीज सावंतवाडी, मालवण आणि वेंगुर्ला पालिकांची तसेच कणकवली नगरपंचायतीचही सार्वत्रिक निवडणूक आहे. या निवडणुका जिंकण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकांचे कल महत्त्‍वाचे ठरणार आहेत. त्यामुळे भाजपच्या नेतेमंडळींनी जोरदार प्रचार यंत्रणा राबविल्याचे चित्र गावागावांत आहे. त्याअनुषंगाने प्रचार संपण्याच्या दिवसापर्यंत भाजप आणि शिवसेना पक्ष नेत्यांकडून कार्यकर्त्यांचे प्रवेश सोहळे केले जात होते.
गावच्या निवडणुकीत आधी भावकी, नातेसंबंध आणि नंतर गटतट पाहिले जातात. त्यामुळे अनेक गावांमध्ये ओल्या, सुक्या जेवणावळीही मोठ्या प्रमाणात झाल्या. सर्वच उमेदवारांनी प्रत्येक मतदाराशी थेट संवाद साधला. महत्त्‍वाची बाब म्हणजे यंदाच्या निवडणुकीत गावागावांत वादावादी, भांडणाचे प्रसंग घडले नाहीत. आज प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर रात्र वैऱ्‍याची या उक्तीप्रमाणे मतदानाच्या दिवशी सकाळपर्यंत अंतर्गत बैठका व चर्चांची खलबते सुरू राहणार आहेत. आतापर्यंत प्रचारात वापरलेल्या मुद्द्यांचा, केलेल्या विकास कामांचा तसेच त्यांनी मतदारांना दिलेल्या आश्वासनांचा कितपत परिणाम झाला याचे चित्र मतमोजणी दिवशीच स्पष्ट होणार आहे.

मतपत्रिकेवरही सर्वात वर सरपंचपदाचे उमेदवार
मतदान यंत्रात सर्वात वर सरपंचपदासाठीची मतपत्रिका असणार आहे. त्याखाली त्या त्या प्रभागातील उमेदवारांची मतपत्रिका असणार आहे.

निवडणूक चित्र
एकूण ग्रामपंचायती*३२५
बिनविरोध सरपंच*३२
सरपंचपदाचे उमेदवार*७९०
सदस्य उमेदवार*४६४९
जिल्ह्यात ९४४ मतदान केंद्रे