''सागर मित्र'' नियुक्तीस हिरवा कंदील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''सागर मित्र'' नियुक्तीस हिरवा कंदील
''सागर मित्र'' नियुक्तीस हिरवा कंदील

''सागर मित्र'' नियुक्तीस हिरवा कंदील

sakal_logo
By

‘सागर मित्र’ नियुक्तीस हिरवा कंदील
रविकिरण तोरसकरः मत्स्य संपदा योजनेच्या प्रसारासाठी पद निर्मिती
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १६ ः पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेंतर्गत ‘सागर मित्र’ नियुक्तीस शासनाचा हिरवा कंदील मिळाला असल्याची माहिती प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे कोकण संयोजक रविकिरण तोरसकर यांनी दिली.
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना देशातील जास्तीत जास्त घटकांपर्यंत पोहोचावी यासाठी सरकार व लाभार्थी यामधील दुवा म्हणून सागर मित्र या पदाची निर्मिती करण्यात आली. सागर मित्र या पदावर स्थानिक बेरोजगार, परंतु मत्स्य व्यवसायाशी संबंधित शैक्षणिक अहर्ता असणाऱ्या युवक युवतींची कंत्राटी पद्धतीने २०२१-२०२२ या कालावधीसाठी भरती केली होती. परंतु, २०२२-२३ या कालावधीत सागर मित्र या पदासाठी नियुक्ती झाली नाही. त्यामुळे मत्स्य व्यवसायात इच्छुक असलेल्या व्यक्तींना योजनेची माहीती व लाभ मिळविण्यात अडचणी येत होत्या. या नियुक्त्या लवकरात लवकर व्हाव्यात यासाठी जिल्हा उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या माध्यमातून मत्स्योद्योग मंत्री सुधीर मुगंटीवार तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्यास यश आले असून महाराष्ट्र शासनाने ९ डिसेंबरला परिपत्रक काढून ‘सागर मित्र’ नियुक्तीस हिरवा कंदील दाखविला आहे.
या अध्यादेशाद्वारे पूर्वी काम केलेल्या सागर मित्रांना नियुक्त्या देणे सुरू झाले आहे. सध्या या सागर मित्रांना चार महिन्यासाठी नियुक्त केले जाणार असून भविष्यात त्यांचा कालावधी वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तरी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी सागरमित्र यांच्याशी संपर्क साधावा. पूर्वी काम करत असलेल्या सागरमित्रांनी अथवा नवीन इच्छुकांनी संबधित जिल्ह्याच्या मत्स्य व्यवसाय कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. तोरसकर यांनी केले आहे.