
मेळावा बातमी उदय सामंत जोड
रत्नागिरीकरांचे विकासावरील प्रेम
विक्रमी सभेतून दिसले ः सामंत
उदय सामंत म्हणाले, ‘‘रत्नागिरीची जनता विकासावर प्रेम करणारी आहे. सर्वसामान्यांचा नेता काय असतो, हे आता सर्वांना कळलं असेल. ५००-१००० लोकांत बोलायचं, अशी ही आमची सभा नाही, ही विक्रमी सभा आहे.’’
रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मोजक्यांच शब्दांत भाषण केले; मात्र सामंतांच्या प्रत्येक वाक्यावर शिवसैनिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सत्तापरिवर्तनानंतर रत्नागिरीत प्रथमच अशी मोठी सभा झाली. उदय सामंत यांनी उपस्थितांचे जाहीर आभार मानले.
गुवाहाटीचा सांगितला किस्सा
भाषणाच्या सुरुवातीलाच पालकमंत्री उदय सामंत यांनी २४ जूनला पहाटे पावणेपाच वाजता एकनाथ शिंदे यांचा फोन आला. त्यानंतर आपण गुवाहाटीला कसे गेलो? याचा किस्सा सांगितला आणि सभास्थळी हशा पिकला. गुवाहाटीवरून आल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि मी उद्योगमंत्री झालो.
मातोश्रीचे नाव न घेता टीका
ही सभा ‘त्यांनी’ पहावी
सभेला झालेल्या गर्दीवरून ‘मातोश्री’चे नाव न घेता टीका केली. या गर्दीने ज्यांच्यापर्यंत जे पोहोचायचं असेल ते पोहोचलं असेल. रस्त्यावरील बांधावर बसून भाषण ऐकणारे ही गर्दी पाहून उद्या कदाचित वेगळा निर्णय घेतील, असा चिमटादेखील ना. सामंत यांनी यावेळी काढला.
ही कॉर्नर नाही तर जाहीर सभा
काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आदित्य ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. त्यांनी साळवी स्टॉप येथे जाहीर सभा घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली होती; मात्र आपल्या भाषणात ना. सामंत यांनी नाव न घेता त्याच्यावर टीकास्त्र सोडले. ५००-१००० लोकांमध्ये येऊन बोलायचं अशी ही आजची सभा नाही. तर विक्रमी सभा आहे. आजवर झालेल्या सर्वच सभांमध्ये सर्वाधिक गर्दी झाल्याचे, उद्योगमंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले.
बदनाम करण्याचा प्रयत्न
मंत्री सामंत म्हणाले, ‘‘आजवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कायमस्वरूपी बदनाम करण्याचा काही लोकांचा प्रयत्न सुरू आहे, त्या व्यक्ती कोण? हे सारं माहीत आहे. मात्र, सर्वसामान्यांचा नेता कसा असतो? हे आता सर्वांना कळलं असेल.’’
फक्त बाळासाहेबांची शिवसेना
लांजा येथील माजी नगराध्यक्षांसह सर्व माजी नगरसेवकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्यानंतर तोच धागा पकडत पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, ‘‘कोणी कितीही वल्गना करो, जिल्ह्यात फक्त बाळासाहेबांचीच शिवसेना राहील.’’