कणकवली तालुक्यात चुरशीने मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली तालुक्यात चुरशीने मतदान
कणकवली तालुक्यात चुरशीने मतदान

कणकवली तालुक्यात चुरशीने मतदान

sakal_logo
By

69254
कलमठ ः येथे सकाळी मतदान करण्यासाठी केंद्रावरी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या

69255
हरकुळ खुर्द ः येथे सरपंचपदाचे उमेदवार संजय रावले यांनी मतदाना हक्क बजावला

69256
वरवडे ः फणसनगर प्राथमिक शाळेतील केंद्रावर माजी खासदार तथा भाजपनेते नीलेश राणे यांनी मतदान केले.

69257
फोंडाघाट ः शाळा क्रमांक १ येथे महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांग लावली होती.

69258
कलमठ ः आमदार वैभव नाईक यांनी बूथवर जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली.

69259
वागदे ः येथील केंद्रावर नवरदेव विनायक परब यांनी मतदान केले.

कणकवली तालुक्यात चुरशीने मतदान

कार्यकर्त्यांची गर्दी; पोलिसांचा कडक बंदोबस्त, बिघाडामुळे दोन मशीन बदलले, शांततेत प्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १८ ः तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतीच्या सदस्यपदांससह ४९ ठिकाणी थेट सरपंच निवडीसाठी आज चुरशीने मतदान सुरू होते. मतदान केंद्राबरोबरच केंद्राबाहेरही कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. नाटळ आणि कार्जिडे या मतदान केंद्रावर मतदान यंत्रात किरकोळ बिघाड झाल्याने दोन्ही ठिकाणी मशीन बदलण्यात आले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तहसीदार रमेश पवार यांनी दिली. ही घटना वगळता तालुक्यात दुपारपर्यंत शांततेत मतदान प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी जागोजागी कडक बंदोबस्त ठेवला होता.
तालुक्यामध्ये ४९ ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी ११८ उमेदवार रिंगणात असून ५२ ग्रामपंचायतीच्या ३५२ सदस्य पदासाठी ७३५ उमेदवार रिंगणात आहेत. गावागावातील मतदान केंद्रावर सकाळपासून मत देण्यासाठी नागरिकांची गर्दी सुरू झाली होती. दुपारपर्यंत जवळपास ३१ टक्के मतदान झाले होते. आज रविवार असल्याने कनेडी आणि नांदगाव हे आठवडा बाजार बंद ठेवण्यात आले होते. उर्वरित ठिकाणी बाजारपेठा सुरू होत्या. सकाळपासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली. शहरी भागात मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने पहिल्या टप्प्यात दहा ते पंधरा टक्के इतके मतदान झाले होते. ग्रामीण भागातील मतदान हे २५ टक्के पेक्षा अधिक होते. दुपारी हा आकडा ३१ टक्केपर्यंत पोहोचला होता. सायंकाळपर्यंत मतदानात कमालीची वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे यंदा मतदान प्रक्रियेत मतदारांनी चुरशीच्या सहभाग घेतल्याचा पाहायला मिळते. मतदारांना घरापासून आणण्यासाठी वाहनांच्या सुविधाही होत्या. कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांना बाहेर काढत होते. आपल्या उमेदवाराला मतदान व्हावे म्हणून कार्यकर्त्यांची घालमेल सुरू होती. वडापाव आणि पाणी सोबत घेत कार्यकर्ते गावात फिरताना दिसत होते.
तालुक्यात सकाळी साडेनऊच्या पहिल्या टप्प्यांमध्ये १२.४४ टक्के इतके मतदान झाले. यात ६ हजार ६००८ पुरुष तर ३ हजार ७३२ महिला मतदार मिळून एकूण १० हजार ३४० जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर साडेअकराच्या पर्यंतच्या दुसऱ्या टप्प्यांमध्ये १४ हजार २४० पुरुष तर ११ हजार ७२४ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने एकूण २५ हजार ९९५ मतदारांनी हक्क बजावला होता. त्यामुळे सुमारे ३१ टक्के पेक्षा अधिक मतदान झाले होते. दुपारनंतर मतदान वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. चिंचवली गावामध्ये पहिल्याच टप्प्यात २६ टक्के, सतरल गावात २७ टक्के तर आशीये गावामध्ये २१ टक्के मतदान झाले होते. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी तालुक्यातील विविध मतदान केंद्राबाहेरील कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन प्रोत्साहन दिले तर भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे हे मालवणसह कणकवली तालुक्यामध्ये दौरा करून त्यांनी वरवडे फणसनगर येथील मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे दिल्लीत आहेत तर नितेश राणे हे अधिवेशनासाठी नागपूरकडे रवाना झाले आहेत. मतदान केंद्राबाहेर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पाहायला मिळत होते. महिलांमध्येही यंदा उत्सुकता होती. मतदान करण्यासाठी लोक वाहनाने प्रवास करीत होते. दुपारपर्यंत शांततेत मतदान असले तरी पोलीसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे. ठाणे जिल्ह्यातून जादा पोलीस तुकडी मागण्यात आली आहे. संवेदनशील असलेल्या या तालुक्यांमध्ये मतदान शांततेत व्हावे, असा प्रयत्न निवडणूक विभागाने सुरू आहे.
-------
चौकट
नवरदेव मतदानासाठी
वागदे गावातील विनायक परब या तरूणाचा आज विवाह आहे. मात्र, त्यांनी वागदे येथील शाळा क्र. एक येथे प्रथम मतदान केले. त्यानंतर कणकवली शहरातील विवाह सोहळ्यासाठी गेले. सकाळी नऊच्या सुमारास त्यांनी मतदान केले.
-----------
चौकट
वरवडेत दोन गटांतच चुरस
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा गाव असलेल्या वरवडे गावामध्ये भाजप पुरस्कृत दोन गटांमध्ये चुरशीने लढत होत आहे. येथे शिवसेनेचा उध्दव ठाकरे गटाने पुरस्कृत केलेला सरपंच पदासाठी एक आणि सदस्य पदासाठी एक उमेदवार आहे. उर्वरित लढत ही भाजपच्या दोन गटांमध्ये होत आहे. ही लढत खेळीमेळीची असल्याचे दोन्ही गटाच्या प्रमुखांनी सांगितले.
-------------
चौकट
नीलेश राणेंनी केले मतदान
माजी खासदार निलेश राणे यांनी मालवणसह कणकवलीचा विविध गावामध्ये दौरा काढून कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन प्रोत्साहन दिले. वरवडे येथे त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. वरवडे गावात गटबाजी नसून यावर मी काही बोलणार नाही, असे त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींनी केलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना नमूद केले.