
रत्नागिरी-फळमाशीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात हापूस होईल बॅन
फळमाशीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात हापूसला फटका
आंबा व्यापारी अशोक हांडे ; दोन वर्षे बागांमध्ये सक्रिय
रत्नागिरी, ता. १८ ः आंबा व्यवसायावर तुडतुडे, थ्रीप्स, बुरशी, मिलीबग, फळमाशी इत्यादी संकटे उभी आहेत. त्यातील फळमाशी हा सर्वात मोठा शत्रू असून त्यावर वेळीच उपाययोजना केली नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हा हापूस बॅन (बहिष्कृत) होण्याची भिती आहे. त्यावर मात करण्यासाठी त्वरित पावलं उचलली पाहिजेत, असे मुंबईतील आंबा व्यापारी अशोक हांडे यांनी केले.
देवगड येथे झालेल्या आंबा बागायतदारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अशोक हांडे यांनी शेतक-यांसाठी पायाभूत सुविधा तसेच पॅकिंग, ग्रेडिंग, सॉटींग या बाबत शेतक-यांना मार्गदर्शन केले. फळमाशी विरोधात विविध उपाय योजनांबद्दल विद्याधर जोशी, माजी आमदार अजित गोगटे, संदिप कुलकर्णी यांनी माहिती दिली. १५ मे २०२१ रोजी वादळी पाऊस झाला. त्यावेळी आंबा खाली पडला आणि त्यात फळमाशांनी प्रचंड प्रमाणात अंडी घातली. तीच अंडी २०२२ मध्ये सक्रिय होऊन त्यांनी उच्छाद मांडला. फळमाशीचा आंबा निर्यात झाला व आखाती देशात बोंबाबोंब सुरू झाली. त्यामुळे हापूस बॅन (बहिष्कृत) होईल की काय अशी भीती निर्माण झाली. फळमाशी विरोधात काय करता येईल यावर चर्चा झाली. मुंबईतील निर्यातदारांनी केलेले प्रयत्न हांडे यांनी सांगितले. झाडावरून पडलेली फळे दोनचार दिवस तशीच ठेवावीत व त्यानंतर गोळा करून खड्डा करून चक्क जाळून टाकावीत, फु्रट फ्लायचे ट्रॅप लावावेत. डॉ. राहूल मराठे यांनी सल्ला दिल्याप्रमाणे मित्र किडा बायो सोल्युशन या औषधाची फवारणी झाडाखाली करून जमिनीतील फळमाशांची अंडी खाणारे किडे तयार करणे. हे औषध खोड व फांद्यांवर मारल्यास खोडकिडही मरते असा त्यांचा दावा आहे. बिसलेरीच्या बाटलीवर विशिष्ट औषधाचा स्प्रे मारून त्यावर चिकटलेल्या फळमाशा जाळून टाकणे. हैद्राबाद च्या एका कंपनीने विशिष्ट प्रकारची जेल शोधली असून त्यात विशिष्ट प्रमाणात काही कीटकनाशके टाकून ते जेल (बबलगम सारखे दिसणारे) साधारण प्रत्येकी १० ते १२ फुट अंतरावर झाडांच्याच खोडावर लावल्यास नर व मादी दोन्ही आकर्षित होतात. त्याला स्पर्श झाल्यास माशा मरतील असा त्यांचा दावा आहे. फिमेल माशांसाठी प्रोटीन सारखे खाद्यपदार्थ कीटकनाशके मिसळून टाकल्यास ते खाऊन त्या मरतील असाही एक युक्तिवाद आहे. फळमाशीविरोधात कोकणातील सर्व बागाईदारांनी एकत्रित पणे लढण्याची आवश्यकता आहे असे श्री. हांडे यांनी सांगितले.
आंब्याचा खर्च कमी करा
आंब्याचा दर आणि खर्च यातील तफावत कमी करण्यासाठी अगदी छोटे प्रयत्न करून खर्च जास्तीत जास्त कमी करण्याचे त्यांनी आवाहन केले. अतिशिघ्र नाशिवंत या प्रकारात आंबा मोडत असल्याने त्यास हमीभाव मिळणे शक्य होत नाही. पण सरकार तशी हमी पातळी ठरवून शेतक-यांना नुकसानभरपाई देऊ शकते, असंही हांडे यांनी सांगितले.