रत्नागिरी- वेतन आयोग देण्यास सकारात्मक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- वेतन आयोग देण्यास सकारात्मक
रत्नागिरी- वेतन आयोग देण्यास सकारात्मक

रत्नागिरी- वेतन आयोग देण्यास सकारात्मक

sakal_logo
By

rat१९p११.jpg- KOP२२L६९४४१ रत्नागिरी ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुष्पगुच्छ देऊन एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने स्वागत करताना राजेश मयेकर. सोबत पालकमंत्री उदय सामंत, सूर्यकांत साळवी, मंगेश देसाई, उदय कदम, बंटी विश्वासराव, सचिन वायंगणकर, आनंद काताळकर, अनिकेत सावंत आदी.

एसटीत वेतन आयोग लागू करण्यास सकारात्मक
मुख्यमंत्री शिंदे ; कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी
रत्नागिरी, ता. १९ ः एसटी कर्मचाऱ्यांच्या अभूतपूर्व संपानंतर कर्मचारी शांत राहिले होते. यानंतर राज्यात सत्तांतर झाले. त्यामुळे पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांनी रत्नागिरीत आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून घेऊन वेतनवाढीची मागणी केली. कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी वेतन आयोग लागू करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी देईल, असे आश्वासन दिले.
रत्नागिरी दौऱ्यादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी शिंदे यांची भेट घेतली. त्या वेळी युवानेता अनिकेत सावंत यांनी एसटी विभागीय कार्यालयाबाहेर एसटीची आकर्षक प्रतिकृती भेट दिली. ही प्रतिकृती शिंदे यांना खूपच आवडली आणि त्यांनी सावंत यांचे कौतुक केले. शासकीय विश्रामगृह येथे शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देताना सूर्यकांत साळवी, मंगेश देसाई, उदय कदम, राजेश तथा नाना मयेकर, बंटी विश्वासराव, सचिन वायंगणकर, आनंद काताळकर, अनिकेत सावंत उपस्थित होते.
संप मिटल्यानंतर पाच महिने कोणत्याही संघटना वेतनवाढ किंवा आयोग लागू करण्याबाबत बोलत नव्हत्या. यामुळे निवृत्त कर्मचारी संतोष शेट्ये, रत्नागिरी आगारातील विभागीय भांडार शाखेतील चालक मंगेश देसाई यांनी मंत्री उदय सामंत यांच्याशी वारंवार हा विषय मांडण्याकरिता बैठक बोलावण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सामंत यांनी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे नियोजन केले. सामंत यांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडण्याकरिता मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी आग्रही राहिले. याबद्दल कर्मचाऱ्यांनी सामंत आणि मुख्यमंत्र्यांचे विशेष आभार मानले.


पॉइंटर
*एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली भेट
* उद्योगमंत्री उदय सामंत यांचे प्रयत्न
* मुख्यमंत्र्यांना एसटीची प्रतिकृती
* संपानंतर कर्मचाऱ्यांचे वेतनवाढीसाठी प्रयत्न


चौकट १
वेतन आयोगातील त्रुटी दूर करा
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, एसटी कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती केल्याने शासकीय कर्मचारी व रा. प. कर्मचारी यांच्या वेतनामध्ये ५, ६वा आणि ७वा वेतन आयोग देताना फार मोठी तफावत निर्माण झाली. रा. प. कर्मचाऱ्यांची वेतनवाढ ही वेतन आयोगाप्रमाणे न होता ती चुकीच्या पद्धतीने झाल्याने त्यांचे जीवनमान खालावले आहे. मिळणाऱ्या वेतनात कुटुंब चालवणे अतिशय अडचणीचे होत असल्याने, कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. रा. प. कर्मचाऱ्यांना सहा महिन्यापूर्वी वेतनवाढ करताना चुकीचे निकष लावल्याने ज्येष्ठ कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊन सेवाज्येष्ठतेचा फायदा मिळालेला नाही. त्यामुळे कनिष्ठ कर्मचाऱ्यांपेक्षा ज्येष्ठ कर्मचारी कमी वेतन घेत आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ दर ३ टक्के असून सन २०१६ पासून रा. प. कर्मचाऱ्यांचा वेतनवाढ दर हा २ टक्के आहे. सोबत घरभाडे दरदेखील १ टक्क्याने कमी दिला जात आहे. मागील वेतन आयोगातील त्रुटी दूर करून सातव्या वेतन आयोगाची वेतन निश्चिती करून द्यावी.