
संक्षिप्त
जिल्ह्यात खोकल्यांच्या संसर्गात वाढ
रत्नागिरी ः वातावरण बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे सध्या सर्वत्रच सर्दी, खोकल्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर दिसू लागले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये वाढ झाली असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून करण्यात आले आहे. वातावरण बदलामुळे गेल्या दोन तीन दिवसात जिल्ह्यात तापमान वाढ होत असून उष्माही वाढला आहे. तर पहाटेच्या वेळेस काहीसा गारवा अनुभवायला मिळत आहे. याचा आरोग्यावर परिणाम होत असून लहान मुले आणि वृद्धांमध्ये खोकल्यांचा संसर्ग होत आहे. खासगी मेडिकलमध्येही सर्दी खोकल्यांच्या औषधांची मागणीत वाढ झाली आहे. वातावरण बदलामुळे सर्दी येण्याआधी घसा खवखवणे, डोकेदुखी आणि अंगदुखी अशी काही लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये खेकल्याचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. गरम पाणी पिणे आणि योग्य औषधोपचाराने खोकला लवकरच बरा होतो अन्यथा आठवडाभर हा खोकला कमी होत नाही, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली.
-----------------------
दापोलीतील बालउद्यानाची स्वच्छता
दाभोळ ः दापोली शहरातील कोकंबआळी येथील बालउद्यान गेली अनेक वर्ष नादुरुस्ती अवस्थेत असून तेथील साफसफाईदेखील करण्यात येत नसल्याने तेथील नागरिकांनी आवाज उठवल्यावर या उद्यानाची नगरपंचायतीने स्वच्छता केल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. दापोली शहरातील कोकंबआळी येथे लहान मुलांनासाठी कोकंबआळी येथे उद्यान उभारण्यात आले होते; मात्र या उद्यानाकडे नगरपंचायतीने दुर्लक्ष केल्यामुळे या ठिकाणी असलेली खेळणी नादुरुस्त झाली असून सुशोभीकरणदेखील नष्ट झाले. या ठिकाणी रानटी झाडे, गवत, वेलींचे रान झाले असल्याने येथे लहान मुले खेळण्यासाठी येत नसत. या उद्यानाची लवकरात लवकर डागडुजी करून मुलांसाठी उद्यान सुरू करावे, अशी मागणी शहरातील व कोकंबआळी येथील नागरिकांनी केली आहे.
दापोली-मुरादपूरमार्गे
मुगीज बसची मागणी
दाभोळ ः दापोली-मुरादपूर व्हाया मुगीज सोवेली ही एसटी बससेवा नियमित सुरू ठेवण्याबाबतचे निवेदन दापोली आगाराला सोवेली ग्रामविकास मंडळाने दिले आहे. मुरादपूर येथील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यास दुसरा कोणताही पर्याय नाही. मुख्यतः सकाळच्या सत्रात शाळेत जाणारे विद्यार्थी लाटवण शाळा, मुरादपूर उर्दुशाळा या विद्यार्थ्यांना फार सोईची बस नाही. मुगीज, सोवेली, भाटघर, विन्हे, भोळवली, लाटवण या गावातील विद्यार्थी व ग्रामस्थ यांना ही बससेवा अत्यंत उपयुक्त ठरत असल्याने ही बस सकाळी ८ वाजता व दुपारी 4 वाजता नियमित वेळेत सोडावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.