सिंधुदुर्गातील 39 सैनिकांचे देशासाठी बलिदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गातील 39 सैनिकांचे देशासाठी बलिदान
सिंधुदुर्गातील 39 सैनिकांचे देशासाठी बलिदान

सिंधुदुर्गातील 39 सैनिकांचे देशासाठी बलिदान

sakal_logo
By

swt१९११.jpg
६९५०६
सिंधुदुर्गनगरीः जिल्हा सैनिक कार्यालयात वीरमरण आलेल्या सैनिकांची तयार करण्यात आलेली फोटो गॅलरी.

swt१९१२.jpg
६९५०७
सिंधुदुर्गनगरीः जिल्हा सैनिक कार्यालयाने कार्यालय आवारात लावलेली ‘शहीद दिनदर्शिका’.


सिंधुदुर्गातील ३९ सैनिकांचे देशासाठी बलिदान
डिसेंबरमध्ये सर्वाधिक शहिदः देशाच्या रक्षणासाठी गमावले प्राण
विनोद दळवीः सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १९ ः सिंधुदुर्गातून देशाच्या संरक्षणासाठी आतापर्यत तब्बल ३९ जणांनी प्राणाची आहुती दिली आहे. यात सर्वाधिक म्हणजे तब्बल ७ सैनिक डिसेंबर महिन्यात शहिद झाले. देशसेवेसाठी त्यांनी दिलेल्या या बलिदानाचा सिंधुदुर्गाला नेहमीच अभिमान आणि आदर राहिला आहे.
सैनिक असा माणूस आहे, जो पूर्ण देशाला आपले कुटुंब मानतो. त्यासाठी तो देशाच्या सीमेवर उभा राहत देशातील नागरिकांची रक्षा करीत असतो. दिवस रात्र मेहनत करीत आपल्याला दुश्मनांपासून सुरक्षित ठेवत असतो. त्यामुळे त्यांना देशाचे खरे देशभक्त समजले जातात. जिल्ह्याला शौर्य़ाची, बलिदानाची परंपरा लाभली आहे. यामुळे सैनिकी पेशा कितीही कठीण असला तरी अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील तरुण भारतीय लष्करात ऊर्जा पेरत आले आहेत. जिल्ह्यात सरंबळ, चौकुळ अशी काही गावे आहेत, जिथे प्रत्येक घरात किमान एकतरी सैनिकी शौर्यगाथा सजलेली दिसते. अनेकांनी आपले आयुष्य देशासाठी पणाला लावले; मात्र त्यांची पुढची पिढीही त्याच आदराने देश आणि सैन्याकडे पाहते.
जिल्ह्यातील देश सेवा करीत असलेल्या सैनिकांनी आतापर्यंत १९६५ चे भारत पाकिस्तान युद्ध, १९७१ चे भारत पाकिस्तान युद्ध, ऑपरेशन पवन, १९६२ चे भारत चीन युद्ध, ऑपरेशन रीहनी, ऑपरेशन रक्षक, ऑपरेशन रक्षक फाल्कन, ऑपरेशन दुर्गमुल्ला (जम्मू व काश्मीर), ऑपरेशन रजी आसाम, ऑपरेशन रक्षक (जम्मू व काश्मीर), नेव्ही ऑपरेशन हुडहुड या युद्धात सहभाग घेतला आहे. या युद्धात विरोधी देशाशी दोन हात करताना जिल्ह्यातील ३९ सैनिकांना वीरमरण आले आहे. यात नायक, हवालदार, विंग कमांडर, सुभेदार, मेजर, शिपाई आदी पदांवर कार्यरत असताना सैनिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
यात १९६२ च्या भारत चीन युद्धात कुर्ली-गावठणवाडी (ता. वैभववाडी) येथील शिपाई विष्णू परब यांना २१ नोव्हेंबर १९६२ ला हुतात्म्य आले. याच युद्धात २० नोव्हेंबरला सबनीसवाडा (ता. सावंतवाडी) येथील रामचंद्र कुडतरकर आणि वसोली (ता. कुडाळ) येथील हवालदार सीताराम रेबांळकर हे शहीद झाले. याच युद्धात मोगरणे-धामापूर (ता.मालवण) येथील तुकाराम पाताडे यांचे १९ नोव्हेंबर १९६२ ला वीरमरण आले. १९६५ च्या भारत-पाक युद्धात कलंबिस्त (ता.सावंतवाडी) येथील नायक बाबली राजगे यांना २३ नोव्हेंबर १९६५ ला, २० सप्टेंबर १९६५ कलंबिस्त येथील शिपाई महादेव पास्ते, डीगस-पाताडेवाडी (ता.कुडाळ) येथील नायक भगवान गायकवाड यांना १९ सप्टेंबर १९६५ ला, दाणोली-मधलीवाडी (ता.सावंतवाडी) येथील शिपाई यशवंत सावंत यांना, इन्सुली-पागावाडी (ता.सावंतवाडी) येथील बाबाजी सावंत यांना १८ नोव्हेंबर १९६५ ला, पोखरण-बौद्धवाडी (ता.कुडाळ) येथील शिपाई धोंडी कदम यांना २३ ऑगस्ट १९६५ ला, सालईवाडा (ता.सावंतवाडी) येथील शिपाई महादेव नाईक यांना २४ सप्टेंबर १९६५ ला, इन्सुली-पागावाडी (ता.सावंतवाडी) येथील शिपाई बाबाजी सावंत यांना २१ सप्टेंबर १९६५ला वीर मरण आले. १९७१ च्या भारत-पाक युद्धात नांदोस-बांधवाडी (ता.मालवण) येथील नायक तुकाराम गावडे यांना ५ डिसेंबर १९७१ ला, नेतर्डे-खैराटवाडी (ता.सावंतवाडी) येथील शिपाई लाडू गवस यांना १४ डिसेंबर १९७१ ला, कणकवली सुलोचनानगर येथील शिपाई सदाशिव बैत यांना २१ डिसेंबर १९७१ ला, सातोसे-रेंगवाडी (ता.सावंतवाडी) येथील शिपाई सहदेव पंडित आणि कणकवली-बांधकरवाडी येथील शिपाई रामचंद्र कदम यांना ३ डिसेंबर १९७१ ला, बेळणे (ता.कणकवली) येथील शिपाई अनंत चाळके यांना ५ डिसेंबर १९७१ ला, शेर्ले-शटकरवाडी (ता.सावंतवाडी) येथील शिपाई अंकुश तारी यांना ७ डिसेंबर १९७१ ला, शिरवली गांगोचीवाडी येथील शिपाई विष्णू जठार यांचे १२ एप्रिल १९७२ ला, वळीवडे- कदमवाडी येथील शिपाई लवू कदम यांचे २२ जानेवारी १९७२ ला असे एकूण ९ जणांनी या युद्धात हुतात्म्य पत्करले आहे.
ऑपरेशन पवनमध्ये ८ सप्टेंबर १९८८ ला कलंबिस्त (ता.सावंतवाडी) येथील लान्स नायक वासुदेव सावंत, ११ मे १९८९ ला आंबोली-फणसवाडी (ता.सावंतवाडी) येथील रामचंद्र गावडे, १६ ऑक्टोबर १९८७ ला माणगाव-देऊळवाडी (ता.कुडाळ) येथील हवालदार एकनाथ नाईक, १ फेब्रुवारी १९८८ ला सांगेली (ता.सावंतवाडी) येथील शांताराम कदम, १६ जुलै १९७४ ला चौकुळ-शेजसवाडी (ता.सावंतवाडी) येथील हवालदार रामचंद्र गावडे, २९ नोव्हेंबर १९८७ ला शिरंगे पुनर्वसन (ता.दोडामार्ग) येथील शिपाई मोहन घाडी यांनी आपले प्राण गमवावे लागले आहेत. ऑपरेशन रीहनोमध्ये २० डिसेंबर १९९३ ला खासकीलवाडा (ता.सावंतवाडी) येथील शिपाई फ्रान्सिस लॉड्रिक्स आणि खासकीलवाडा येथील हवालदार लक्ष्मण शेडगे यांना वीर मरण आले आहे. ऑपरेशन रक्षकमध्ये १७ फेब्रुवारी २००० मध्ये माजगाव-खोतवाडा (ता.सावंतवाडी) येथील शिपाई दीपक सावंत, ८ फेब्रुवारी २००३ ला झरेबांबर पुनर्वसन (ता.दोडामार्ग) येथील नायक जगन्नाथ देसाई, १ जानेवारी २००५ ला साटेली भेडशी (ता.दोडामार्ग) येथील सोमा परब, ९ नोव्हेंबर १९९७ ला पेंडुर-देऊळवाडी (ता.वेंगुर्ले) येथील दत्ताराम मालंडकर, २७ फेब्रुवारी २००० ला कोलझर (ता.दोडामार्ग) येथील पांडुरंग देसाई यांच्या प्राणाची आहुती गेली. ऑपरेशन रक्षक फाल्कनमध्ये २७ नोव्हेंबर २००७ मध्ये पारपोली (ता.सावंतवाडी) येथील सुभेदार अंकुश तेजाम, ऑपरेशन दुर्गमुल्ला (जम्मू व काश्मीर) मध्ये २२ मे २०१६ ला आंबोली-मूळवंदवाडी (ता.सावंतवाडी) येथील नायक पांडुरंग गावडे, ऑपरेशन रक्षक (जम्मू आणि काश्मीर) मध्ये १ जून २०१४ ला उसप (ता.दोडामार्ग) येथील रमेश महादेव गवस आणि १६ मार्च २००८ ला पडवे (ता.कुडाळ) येथील मनीष कदम यांना वीर मरण आले आहे. ऑपरेशन रजी आसाममध्ये गुढीपुर (ता.कुडाळ) येथील तुकाराम ठाकूर यांना ८ जानेवारी १९५७ ला वीर मरण आले आहे. हुडहुड येथील नेव्ही ऑपरेशनमध्ये १२ ऑक्टोबर २०१४ ला सावंतवाडा येथील शुभम सावंत यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.
---------

सहा जणांना
मिळाले वीर चक्र
१९६२ च्या भारत-चीन युद्धात सहभाग सहभाग घेतलेल्या विंग कमांडर विनायक सावंत, १९७१ च्या भारत-पाक युद्धात सहभाग घेतलेल्या सुभेदार अंकुश चव्हाण, माजी हवालदार विठ्ठल सावंत यांना यांना वीर चक्र मिळाले आहे. देशाच्या विरोधकां विरोधात दोन हात करताना शहीद झालेल्या तीन वीरांना वीर चक्र देण्यात आले आहे. यात ऑपरेशन रीहनोमध्ये शहीद झालेल्या खासकीलवाडा येथील हवालदार लक्ष्मण शेडगे, ऑपरेशन दुर्गमुल्ला (जम्मू आणि काश्मीर) या युद्धात शहीद झालेल्या आंबोली-मुळवंदवाडी येथील नायक पांडुरंग गावडे तसेच ऑपरेशन रक्षक (जम्मू आणि काश्मीर) मध्ये शहीद झालेले पडवे येथील लेफ्टनंट मनीष कदम यांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३९ जणांनी देश रक्षणासाठी आपले प्राण गमावले आहेत. यामुळे ३५ महिला वीर पत्नी ठरल्या आहेत.
----------
चौकट
स्मृतींचे असेही जतन
देशाच्या सैनिक सेवेत काम करणाऱ्या सैनिकांना सेवा देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शासनाने स्वतंत्र जिल्हा सैनिक कार्यालय सुरू केले आहे. गतवर्षी आपण देशाच्या स्वातंत्र्याचा ७५ वा महोत्सव साजरा केला. या महोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हा सैनिक कार्यालयाने वीर मरण आलेल्या सिंधुदुर्ग पुत्राच्या फोटोची गॅलरी तयार केली आहे. यात कार्यालयाच्या भिंतीवर नागरिकांना दिसतील असे, शहीद पुत्रांचे फोटो फ्रेम करून लावले आहेत. यात काहींचे फोटो मिळालेले नाहीत. या पुत्रांना ज्या दिवशी वीर मरण आले आहे, त्याचे कॅलेंडर लावण्यात आले आहे. यातील वीर मरण आलेल्या दिवशी त्या शहीद पुत्राच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. या फोटो गॅलरीमुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिलेल्या शुर वीरांची माहिती व त्यांचे फोटो नागरिकांना पाहता येत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
----------