
मालवणच्या ऐश्वर्य मांजरेकरची लीडरशिप शिबिरासाठी निवड
swt१९१८.jpg
६९५९७
ऐश्वर्य मांजरेकर
मालवणच्या ऐश्वर्य मांजरेकरची
लीडरशिप शिबिरासाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १९ : नॅशनल गांधीयन लीडरशिप शिबिर २०२२-२३ साठी येथील ऐश्वर्य मांजरेकर याची निवड करण्यात आली. युवकांमध्ये नेतृत्व क्षमता निर्माण करण्यासाठी गांधी रिसर्च फाउंडेशनद्वारे १२ दिवसांचे राष्ट्रीय गांधीवादी नेतृत्व शिबिर (एनजीएलसी) गांधी रिसर्च फाउंडेशन, गांधीतीर्थ, जळगाव येथे २१ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत आयोजित केले आहे.
या शिबिरामध्ये क्षेत्रकार्य मुलाकात, रोल प्ले, सामुदायिक संवाद, ग्रामीण जीवनशैली, अनुभव प्रशिक्षण कार्यशाळा, समूह कार्य, व्याख्यान, मुसाफरी, सांस्कृतिक कार्यक्रम, कम्युनिकेशन, विविध प्रकारचे मीडिया, युवकांपुढील आव्हाने व जीवन कौशल्ये, व्यक्तिमत्व विकास व जीवन मूल्यांचे शिक्षण अशा विविध बाबींचा समावेश आहे. शिबिरामधील सहभागी व्यक्तींना कणखर नेतृत्वासाठी तयार केले जाते.
शिबिराचे मुख्य उद्दिष्ट महात्मा गांधीजींच्या विचारांवर आधारीत नेतृत्व कौशल्ये तयार करणे आणि सध्याच्या राजकीय संदर्भात त्यांची प्रासंगिकता, शांतता राजदूत विकसित करणे, पर्यावरण आणि विकास-आधारीत नेतृत्व तयार करणे, तरुणांना अहिंसक समाज निर्माण करण्यास प्रवृत्त करणे, सार्वजनिक प्रशासन आणि धोरणाचा पाया घालणे, तरुणांचा प्रभावी सहभाग आणि प्रशासनात त्यांचे नेतृत्व सुलभ करणे हे आहे. या शिबिरासाठी संपूर्ण भारतातील युवकांनी अर्ज केले होते. त्यामधून टॉप ५० तरुणांची निवड या नॅशनल लिडरशीप शिबिरासाठी झाली आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील ऐश्वर्य मांजरेकर याचा समावेश आहे. ऐश्वर्य हा व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज कुडाळचा विद्यार्थी आहे. प्रशिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.