ठाकरे शिवसेनेसाठी धोक्याची घंटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाकरे शिवसेनेसाठी धोक्याची घंटा
ठाकरे शिवसेनेसाठी धोक्याची घंटा

ठाकरे शिवसेनेसाठी धोक्याची घंटा

sakal_logo
By

ठाकरे शिवसेनेसाठी धोक्याची घंटा
वैभववाडीतील स्थितीः भाजपने गड राखला पण आत्मचिंतनाची गरज
सकाळ वृत्तसेवाः एकनाथ पवार
वैभववाडी, ता. २१ः भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी कंबर कसून केलेला प्रचार, त्यांच्यामागे उभे राहिलेले खंबीर पक्ष नेतृत्व, पराभवाच्या मानसिकतेतून निवडणुकीला सामोरे गेलेली ठाकरे शिवसेना, निष्प्रभ ठरलेले आणि निवडणुकीपासून दूर राहिलेले काँग्रेस, राष्ट्रवादी यामुळे भाजपने वैभववाडी तालुक्यावरील वर्चस्व ग्रामपंचायत निवडणुकीत अबाधित ठेवले; परंतु बंडखोरी थोपविण्यात आलेल्या अपयशामुळे तीन ग्रामपंचायती गमावल्याने त्यांना आत्मचिंतन करावे लागणार आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने विचार केल्यास हा निकाल ठाकरे शिवसेनेसाठी तालुक्यात धोक्याची घंटा मानली जात आहे.
वैभववाडी तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींचा अपेक्षित निकाल मंगळवारी जाहीर झाला. एखाद्या ग्रामपंचायतीचा निकाल वगळता अन्य सर्व निकाल हे राजकीय जाणकारांसाठी अपेक्षितच होते. या निवडणुकीत भाजपने आठ ग्रामपंचायती जिंकल्या. ठाकरे शिवसेनेने दोन, त्यातही एक ईश्वरचिठ्ठीने जिंकली. तर शिंदे गटाने एक ग्रामपंचायत जिंकून खाते खोलले. या निवडणुकीत काँग्रेसने एक दोन उमेदवार उभे करण्याचे धाडस दाखविले; परंतु राष्ट्रवादीला ते देखील करता आले नाही.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी १७ ग्रामपंचायत निवडणुका होत असल्याने या निकालाचा निम्म्या तालुक्यावर प्रभाव जाणवणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे जिल्हा परिषद निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात होते. भाजपने त्याच ताकदीने या निवडणुकीची रणनीती आखली. कोणत्या गावात कोणत्या कार्यकर्त्याचा प्रभाव आहे, कोण उमेद्वार असायला पाहिजे, याची सांगड घालीत उमेद्वार निश्चित केले. एकापेक्षा जास्त इच्छुक असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर मतदानाच्या दिवसापर्यंत तालुका पदाधिकाऱ्यांनी जीवाचे रान केले. कार्यकर्त्यांनी देखील पदाधिकाऱ्यांनी आखून दिलेल्या रणनीतीनुसार काम केले.
पक्ष नेतृत्व देखील खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाला चांगले यश मिळाले; मात्र काही ठिकाणी भाजपाला बंडखोरी थोपविण्यात अपयश आल्याने नावळे, तिरवडे तर्फ खारेपाटण या ग्रामपंचायती गमवाव्या लागल्या. कोळपेचा निकाल भाजप पदाधिकाऱ्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. कोळपेतील मुस्लीम मतदार भाजपाच्या विरोधात गेला. त्यामुळे तेथे त्यांचा पराभव झाला. त्यामुळे तालुक्यात ८० टक्के यश मिळून देखील भाजप पदाधिकाऱ्यांना या विजयाचा आनंद घेता आला नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. तीन ग्रामपंचायतींतील पराभवाचे आत्मचिंतन त्यांना करावे लागणार आहे.
या निवडणुकीत ठाकरे शिवसेना ''कॅप्टन''शिवाय मैदानात उतरल्याचे चित्र होते. अनेक गावांमध्ये त्यांच्यासाठी वातावरण पोषक होते; परंतु नेत्यांची उंटावरून शेळी हाकण्याची भूमिका, वरिष्ठ नेत्यांचे निवडणुकीकडे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे कार्यकर्त्यांना नेमके काय करावे हेच समजले नाही. त्यामुळे संघटितपणे लढताना ठाकरे सेना दिसली नाही. ठाकरे शिवसेनेची रणनीती या निवडणुकीत दिसली नाहीच; परंतु कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यात देखील वरिष्ठ पदाधिकारी पूर्णतः अपयशी ठरल्याचे दिसून आले. त्याचा एकूणच परिणाम निवडणूक निकालावर दिसून आला. या निवडणुकीचे दूरगामी परिणाम तालुक्यातील ठाकरे शिवसेनेवर दिसून येणार आहेत. भविष्यात होणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर काढणे हे त्यांच्यासमोरचे मोठे आव्हान असणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दो्ही पक्ष तालुक्यात नावापुरतेच उरले आहेत. काँग्रेसने दोन-तीन जागा लढविल्या; परंतु राष्ट्रवादी पक्षाला ते देखील जमले नाही. तालुक्यात मनसेची स्थिती त्यापेक्षा वेगळी नाही.
................
चौकट
‘ती’ रणनीती फसली
तालुक्यातील तिरवडे तर्फ खारेपाटण, नावळे या दोन ठिकाणी भाजपला बंडखोरी थोपविण्यात अपयश आले. त्यामुळे त्यांनी निवडून येईल तो आपला, अशी रणनीती ठेवली होती. ही रणनीती या दोन गावांत फसली. नावळेत भाजपच्या दोन उमेदवारांची मते शिंदे गटाच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांपेक्षा अधिक आहेत. तर तिरवडे तर्फ खारेपाटणमध्ये ही रणनीती फसली.
..................
चौकट
पक्षनिहाय मते
भाजपः ३७७०
ठाकरे शिवसेनाः २०९८
शिंदे गटः २४८
अपक्षः ५५१

कोट
भाजपकडून या निवडणुकीत सर्व निवडणुक तंत्रांचा वापर करण्यात आला. त्या तुलनेत आम्ही निवडणूक रणनीती आखण्यात कमी पडलो. त्यामुळे आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. या निवडणुकीचा अहवाल वरिष्ठांकडे देण्यात येणार आहे.
- मंगेश लोके, तालुकाप्रमुख, ठाकरे शिवसेना
................
कोट
गावागावांतील कार्यकर्त्यांनी एकजुटीने केलेले काम आणि आमदार नीतेश राणेंनी तालुक्यात केलेल्या विकासकांमाना दिलेली पोचपावती या निवडणूक निकालातुन आम्हाला मिळाली आहे. भविष्यातील सर्व निवडणुकांमध्ये यापेक्षाही चांगले यश मिळेल.
- नासीर काझी, तालुकाध्यक्ष, भाजप
...................