ग्रामपंचायत निकाल केसरकरांसाठी धक्कादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामपंचायत निकाल केसरकरांसाठी धक्कादायक
ग्रामपंचायत निकाल केसरकरांसाठी धक्कादायक

ग्रामपंचायत निकाल केसरकरांसाठी धक्कादायक

sakal_logo
By

swt2111.jpg
70076
सावंतवाडीः नेमळे ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरे शिवसेनेने सत्ता काबीज केल्यानंतर रुपेश राऊळ यांना उचलून घेत जल्लोष साजरा केला.

swt2112.jpg
L70077
सावंतवाडीः राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे-परब यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले. यावेळी विजयी खूण दाखविताना पदाधिकारी व ग्रामस्थ.

ग्रामपंचायत निकाल केसरकरांसाठी धक्कादायक
सावंतवाडी तालुकाः ठाकरे गटाचे दुसरे स्थान शाबूत
रुपेश हिराप ः सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ः राज्याच्या राजकारणात शिवसेनेत उभी फूट पडूनही ग्रामपंचायत निवडणूकीत उद्धव ठाकरे शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली आहे. तालुक्याचा विचार करता येथे उद्धव शिवसेनेने दुसऱ्या क्रमांकावर राहत आपला गड शाबूत ठेवला असून शिंदे गटाचे पानिपत येथे पाहायला मिळाले. एकूणच दीपक केसरकरांच्या भूमिकेला जनतेने नाकारल्याचे ग्रामपंचायत निकालावरून दिसून आले. तालुक्यात बऱ्याच ठिकाणी शिंदे गटाची मदत झाल्याने भाजप नंबर एकचा पक्ष राहीला आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत भाजपाला याचा फायदा होणार आहे. तालुक्यात एकूण ५२ ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या. यात सात ग्रामपंचायतीचे सरपंच पद बिनविरोध झाले होते तर तीन ग्रामपंचायत पूर्णत: बिनविरोध झाल्या होत्या. मात्र, मतदानानंतर निकालावरून स्पष्ट झालेले चित्र पाहता. जनता उद्धव शिवसेनेसोबत आजही कट्टर असून बाळासाहेबांच्या शिवसेनेला म्हणजेच मंत्री दीपक केसरकरांना जनतेने नाकारल्याने दिसून आले. निवडणूकीच्या ऐन शेवटच्या क्षणी या निवडणुकीसाठी झालेली भाजप व बाळासाहेबांच्या शिवसेनेतील युती पाहता सुरवातील बऱ्याच गावात शिंदे गटाला सदस्यपदांच्या उमेदवाराला झगडावे लागले आणि म्हणूनच काही ठिकाणी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या ठिकाणी बाळासाहेबांची शिवसेना आपले पुर्ण पॅनेल उभे करु शकले. काही ठिकाणी एक दोन सदस्य आणि सरपंच पदासाठी उमेदवार रिंगणात होते. त्यातील काही सदस्य आणि सोनुर्ली व सातुळी, बावळाट सरपंच निवडून आले तर सात ते आठ ठिकाणी जनतेने सरपंच पदाच्या उमेदवारांना नाकारले. दुसरीकडे उद्धव शिवसेनेत भाजपाला जोरदार लढत देत बऱ्याच ठिकाणी आपला गड राखला. ठिकठिकाणी सदस्यही निवडून आले. आज अधिकृतरित्या चराठा, कलंबिस्त, नेमळे, सातार्डा, धाकोरे, पारपोली, वेत्ये, पाडलोस, भोमवाडी येथे सत्ता काबिज केली आहे. चार ते पाच ग्रामपंचायतीमध्ये उद्धव शिवसेनेला निसटसा पराभव स्वीकारावा लागला. बाल्लेकिल्ला असलेल्या माजगाव ग्रामपंचायतीवर मोठ्या फरकाने पराभव झाला. एकुणच तालुक्यातील निवडून आलेले उद्धव सेनेचे सदस्य सरपंच पाहता तालुक्यात दोन नंबरचा पक्ष राहीला आहे.
सावंतवाडी मतदार संघाचे आमदार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर या निवडणुकीत येथे फिरकलेले नाहीत. साधी बैठक घेण्याचे दातृत्व त्यांनी दाखविले नाही. त्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत उद्धव शिवसेनेमध्ये चिड असल्याचे दिसून आले. त्यामुळे उद्धवसेना सगळ्याच ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत सक्रीय दिसून आली. निवडून आलेल्या गावविकास पॅनेल आणि काही ग्रामपंचायतीवर उद्धव सेनेने दावा केला आहे, त्यामुळे शिवसेनेच्या खात्यात अजून भर पडणार आहे.
तालुक्यात राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या पदरी निराशाच पडली आहे. येथे गाव विकास पॅनेल म्हणून आम्ही निवडणूक लढविली होती, असे सरपंच म्हणून निवडून आलेल्या दाजी गावकर यांनी स्पष्ट केले. परंतु, येथे काँग्रेसने दावा केला आहे तर राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडी असा दावा करण्यात आला. एकूणच या सगळ्या निवडणूकीत राष्ट्रवादी पक्षाने पुन्हा एकदा आपला बाल्लेकिल्ला बांधण्यास सुरवात केली आहे. येथे बाळासाहेबांच्या शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीने मजल मारली असून एका ग्रामपंचायतीवर पुर्ण सत्ता काबिज करत काही ग्रामपंचायतींवर सदस्यही निवडून आणले आहेत. सावंतवाडी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. मात्र, गेल्या काही वर्षात येथे पक्षाची पिछेहाट झाली होती. पण, कोकण विभागीय अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी येथे पुन्हा एकदा राष्ट्रवादीला उर्जा दिली आहे.

चौकट
केसरकरांना धक्का
ग्रामपंचायतीचा निकाल पाहता सावंतवाडी मतदार संघात मंत्री केसरकरांना हा मोठा धक्का मानला जात आहे. येथे भाजपानेचे मुसंडी मारली असून केसरकरांचे खंदे समर्थक असलेल्या केसरी, फणसवडे येथील जेष्ठ कार्यकर्ते राघोजी सावंत यांच्या पॅनेललाही पराभव स्वीकारावा लागला. त्यांची कित्येक वर्षाची सत्ता भाजपने हिरावून घेतली आहे. त्यामुळे केसरकरांना आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.