हातिवलेतील टोल वसुली आज बंद पाडणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हातिवलेतील टोल वसुली
आज बंद पाडणार
हातिवलेतील टोल वसुली आज बंद पाडणार

हातिवलेतील टोल वसुली आज बंद पाडणार

sakal_logo
By

हातिवलेतील टोल वसुली
आज बंद पाडणार
नीलेश राणे; सहकाऱ्यांसह धडक देणार

रत्नागिरी, ता. २१ ः मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोलवसुली करू नये, अशी जनतेची आग्रही मागणी आहे. तरीही राजापूर तालुक्यातील हातिवले गावात आज टोलवसुलीला सुरुवात झाली. या विरुद्ध माजी खासदार नीलेश राणे यांनी उद्या (ता. २२) सकाळी दहाला सहकाऱ्यांसोबत टोलनाक्यावर जावून टोल वसुली बंद पाडणार, असा इशारा ट्विटद्वारे दिला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे जिल्ह्यातील काम सात वर्षांनंतरही पूर्ण झालेले नाही. काम पूर्ण झाल्याशिवाय टोलवसुली करू नये, अशी जनतेची आग्रही मागणी होती. तरीही राजापूर तालुक्यातील हातिवले येथे टोलनाका उभारण्यात आला. त्याची माहिती ग्रामस्थांनी राणे यांना भेटीत दिली होती. टोलवसुलीला विरोध नाही; मात्र महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय कोणतीही टोलवसुली करू नये, अशी भूमिका राणे यांनीही घेतली होती. त्यानंतर वसुलीची प्रक्रिया थांबली होती; मात्र आता पुन्हा आजपासून हातिवले येथे टोलवसुलीला सुरवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राणे यांनी हा इशारा दिला आहे.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील टोलनाक्यावर वसुली सुरू होणार होती; मात्र सर्वपक्षीयांनी विरोध केल्यानंतर दोन्ही ठिकाणी टोल वसुली सुरू झाली नव्हती. त्यानंतर हातिवले टोलनाका आणि महामार्ग चौपदरीकरणाचे अर्धवट काम याबाबत ठेकेदार, शासकीय अधिकारी, सर्वपक्षीय पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक झाली होती. त्यानंतर काही संघटनांनी टोलवसुलीला विरोध दर्शविणारी निवेदने तहसीलदारांना देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे टोल वसुली रद्द करण्यात आली होती.