कुस्तीत यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुस्तीत यश
कुस्तीत यश

कुस्तीत यश

sakal_logo
By

rat२१३४.txt

( पान ५ संक्षिप्त)

वैभव जाधव फ्रीस्टाईल कुस्तीत प्रथम

संगमेश्वर ः कसबा येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमधील अकरावीतील वैभव जाधव या विद्यार्थ्याने फ्रीस्टाईल कुस्ती या क्रीडाप्रकारात १७ वर्षाखालील ४८ किलो वजनीगटात विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. कोल्हापुरात ही स्पर्धा झाली. वैभव तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून विभागासाठी पात्र ठरला होता. विभागात प्रथम आल्याने त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या कामगिरीसाठी संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कॕप्टन अकबर खलपे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून कौतुक व अभिनंदन करण्यात आले.
----

बुरंबाड स्कूलमध्ये शालेय क्रीडा स्पर्धा

संगमेश्वर ः तालुक्यातील मॉडर्न इंग्लिश स्कूल बुरंबाड येथे शालेय क्रीडास्पर्धांचे दोन दिवसांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या अंगातील क्रीडाक्षेत्रातील कलाज्ञान जोपासणे हा एकमेव उद्देश समोर ठेवून शाळेने प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले. क्रीडा विभागप्रमुख अनघा चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून खो-खो, कबड्डी, लंगडी, थाळीफेक, गोळाफेक, लांब उडी, उंच उडी असे मुख्य खेळ तसेच लहान मुलांसाठी चमचा गोटी, बिस्कीट इटिंग, बुक बॅलेंसिंग, थिंग्ज कलेक्शन इ. छोटे खेळ आयोजित केले होते. विद्यार्थ्यांनी सर्व खेळांमध्ये उत्तमप्रकारे उत्साह दाखवला व स्पर्धांचा आनंद लुटला. शाळेतील शिक्षकांनी पंच म्हणून आपली कामगिरी बजावली. सर्व स्पर्धा शाळा समिती सदस्य, मुख्याध्यापिका, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत झाल्या.
---

सहा ग्रामपंचायतींवर उद्धव ठाकरे गटाचा दावा

खेड ः रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील गुहागर विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या सहा ग्रामपंचायतींवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारांनी बाजी मारली असून, कार्यकर्त्यांनी खेड तहसीलदार कार्यालयाबाहेर एकच जल्लोष केला. खेडमधील आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदानाला सुरवात झाली. त्यातील गुहागर विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या कोंडिवली, निळीक, घाणेखुंट, संगलट, भेलसई, भोस्ते या सहा ग्रामपंचायतींवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व उमेदवार निवडून आल्याचा दावा तालुकाध्यक्ष चंद्रकांत चाळके यांनी केला आहे. त्यामुळे गुहागर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची ताकद वाढल्याचे बोलले जाते.
---

कोकणात फळप्रक्रिया उद्योग टक्का वाढवा

रत्नागिरी ः कोकणात अनेक फळे तयार होऊनही ती वाया जातात कारण, एकूण उत्पादनापैकी केवळ दीड टक्केच उत्पादनावर फळप्रक्रिया होते. फळप्रक्रिया उद्योगांचा टक्का वाढवावा तसेच कोयनेचे वाया जाणारे अवजल वळवून पाण्याचे दुर्भिक्ष्य कायमस्वरूपी संपवण्याबाबत पेंडसे-कद्रेकर समितीचा अहवाल तत्काळ विचारात घेण्यात यावा, अशा कोकणातील महत्वाच्या विषयांवर विधानसभेत मागण्या शिवसेना नेते, आमदार भास्करराव जाधव यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम १०६ अन्वये अशासकीय ठरावाद्वारे केल्या आहेत.
कोकणातील आंबा, काजू, फणस, जांभूळ, करवंद, कोकम, आवळा,चिंच, नारळ आदी फळांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊनही एकूण उत्पादनापैकी केवळ दीड टक्का फळांवर प्रक्रिया होत असल्यामुळे उर्वरित उत्पादन वाया जाते. कोकणात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ निसर्गावर अवलंबून भातपिक घेऊन कुटुंबाची गुजराण करणारा शेतकरी आणि छोटे छोटे उद्योग व्यवसाय करण्यास उत्सुक असणारे महिला बचतगट यांना उत्पन्नाचा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे यासाठी फळप्रक्रिया उद्योगांचा टक्का वाढवण्यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणी आमदार जाधव यांनी केली आहे.
---

महामार्गावर ११ महिन्यांमध्ये १२९ अपघात

रत्नागिरी ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले असून, मध्येच खाचखळग्यांनी भरलेला हा रस्ता प्रवासी आणि वाहनचालकांसाठी डोकेदुखी बनला आहे. आता तर मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अपघातांमुळे या महामार्गावरील सुरक्षित प्रवासाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या मार्गावर जानेवारी- नोव्हेंबर २०२२ या कालावधीत झालेल्या १२९ प्राणांतिक रस्ते अपघातात १५० जणांना प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे महामार्ग वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीतून पुढे आले आहे. राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी राज्य सरकारतर्फे दरवर्षी रस्ते सुरक्षा मोहीम राबवण्यात येते. या मोहिमेत वाहतूक पोलिस, परिवहन विभागाबरोबरच विविध सामाजिक संस्था सहभागी होतात; मात्र या मोहिमेनंतरही अपघातांचे प्रमाण कमी झालेले नाही. दारू पिऊन अथवा बेदरकारपणे वाहन चालवणे, नियम धाब्यावर बसवून अन्य वाहनांच्या पुढे जाणे इत्यादी विविध कारणांमुळे राज्यात रस्ते अपघात होत आहेत. शिवाय रस्त्यांची दुरवस्था आणि खड्डे चुकवताना अपघाताच्या घटना घडत आहेत. महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात वाढले असून, प्राणांतिक अपघातात मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. महामार्ग वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ११ महिन्यांमध्ये १२९ प्राणांतिक अपघात झाले असून त्यात १५० जणांचा मृत्यू झाला.
---

खालिद दाभोलकर यांचा राष्ट्रवादीला रामराम

चिपळूण ः तालुक्यातील पेठमाप परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादी पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते खालिद दाभोलकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. चिपळूण शहर उपाध्यक्षपदासह त्यांनी पक्षाच्या सदस्यांचाही राजीनामा दिल्याने चिपळूण शहरात एकच खळबळ उडाली आहे. नगर पालिका निवडणुकांच्या तोंडावरच त्यांनी आपले कौटुंबिक कारण पुढे करत राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दाभोलकर यांनी नुकताच आपला राजीनामा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी यांच्याकडे सुपूर्द केला. राष्ट्रवादी चिपळूण शहराचा नुकताच शहरातील बांदल हायस्कूच्या सभागृहात कार्यकर्ता मेळावा झाला होता. या मेळाव्यानंतर काही दिवसातच दाभोलकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा थेट निर्णय घेतल्याने त्यांच्या समर्थकांनाही मोठा धक्का बसला आहे.
----