चिपळूण ः सरपंचाच्या सत्कारासाठी राजकीय पक्षांची चढाओढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः  सरपंचाच्या सत्कारासाठी राजकीय पक्षांची चढाओढ
चिपळूण ः सरपंचाच्या सत्कारासाठी राजकीय पक्षांची चढाओढ

चिपळूण ः सरपंचाच्या सत्कारासाठी राजकीय पक्षांची चढाओढ

sakal_logo
By

फोटो ओळी
- ratchl२१६.jpg ः चिपळूण ः नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी.
-----------
सरपंचांच्या सत्कारासाठी राजकीय पक्षांची चढाओढ
चिपळूण, ता. २१ ः तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यामध्ये १२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर १९ ग्रामपंचायतीत प्रत्यक्षात मतदान झाले. तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ग्रामपंचायतीवर दावा करणाऱ्यांची चढाओढ सुरू आहे तर विजयी झालेल्या सरपंचाच्या गळ्यात हारतुरे घालण्यासाठी राजकीय पदाधिकाऱ्यांची स्पर्धा लागली आहे. थेट सरपंच आपल्या पक्षाचे लेबल लागण्यासाठी काहींनी मोर्चेबांधणी केली आहे.
तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. या निवडणुका राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढल्या जात नाहीत. गावस्तरावरील गट एकत्र येऊन स्थानिक स्तरावरील पॅनलच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जातात. त्यामध्ये अनेकदा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा समावेश असतो. प्रत्यक्षात निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना राजकीय पक्षांचे तालुकास्तरावरील नेते यामध्ये जोमाने सक्रिय झालेले नव्हते. स्थानिक कार्यकर्त्यांनी स्वबळावर या निवडणुका लढवल्या. तालुक्यात केवळ पेढे, शिरगांव, ओमळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पक्षीय राजकारणाचे उघडपणे लेबल लागले होते; मात्र उर्वरित ग्रामपंचायतीत गावपॅनेलच्या माध्यमातून निवडणुका झाल्या. मंगळवारी ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांनी दावे करण्यास सुरवात केली. प्रामुख्याने राष्ट्रवादीसह शिवसेनेनेदेखील तालुक्यात आपलेच वर्चस्व राहिल्याचा दावा केला आहे; मात्र सरपंचपदी विजयी झालेल्या अनेक सरपंचांनी थेटपणे आम्ही याच राजकीय पक्षाचे असल्याचा दावा केलेला नाही. ग्रामपंचायतीवर दावा करण्यास भाजपही मागे राहिलेला नाही. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सरपंचाचा सत्कार करत ते आपलेच असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बुधवारी पेढे, नवीन कोळकेवाडी आणि कळकवणेतील विजयी उमेदवारांचा सत्कार केला. खांदाटपाली, कळकवणे आणि कोळकेवाडी ग्रामपंचायत आमच्याच ताब्यात आल्याचा दावा राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर खरे वर्चस्व कोणाचे यावरून रणसंग्राम सुरू आहे.
----------
कोट
शिरगांव ग्रामपंचायतीत गतवेळी राष्ट्रवादीला मोठे यश मिळाले; मात्र या वेळी राष्ट्रवादीचे ५ सदस्य विजयी झाले असले तरी थेट सरपंचपदी शिवसेना विराजमान झाली. पेढे येथे राष्ट्रवादीने एकहाती वर्चस्व मिळवले. याशिवाय कोळकेवाडी, कळकवणे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला यश मिळलेले आहे. विजयी कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ झाला. उर्वरित सरपंच व सदस्यांचा गौरव लवकरच होणाऱ्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात करण्याचे नियोजन आहे.
- शौकत मुकादम, माजी सभापती राष्ट्रवादी काँग्रेस