
रत्नागिरी ः गणपतीपुळे येथे 24 पासून सरस प्रदर्शन, विक्री
टुडे तीन मेन
गणपतीपुळेत उद्यापासून सरस प्रदर्शन, विक्री
महिला बचत गट ; ६० उत्पादनासह १५ जेवणाचे स्टॉल
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता समुहातील महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. २४ ते २८ डिसेंबर या कालावधीत गणपतीपुळे येथे जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यात पर्यटक, भाविक व शाळांच्या सहली मोठ्या प्रमाणात गणपतीपुळ्याला भेट देतात. त्याचा फायदा मालाची विक्रीला होण्यास मदत होईल, असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, व्यवसायवाढीसाठी आवश्यक भांडवल, उत्पादित केलेल्या मालाचे एकत्रीकरण, ग्रेडेशन, पॅकेजिंग, लेबलिंग, ब्रँडिंग करून, अशा प्रकारच्या प्रदर्शनाद्वारे त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
प्रदर्शनामध्ये रत्नागिरी जिल्हा व कोकण विभागातील जिल्हे मिळून ६० उत्पादने व १५ जेवणाचे स्टॉल, असे एकूण ७५ स्वयंसहाय्यता समूह सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते २४ डिसेंबरला दुपारी २ वाजता होणार आहे. सायंकाळी स्वयंसहाय्यता समुहातील सदस्यांचे लोककला, लोकगीत, भारूडे, वैयक्तिक व सामूहिक यांचे मनोरंजनपर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. स्टॉलमधील सहभागी महिलांसाठी फनी गेम्स आयोजित करण्यात येणार आहेत,अशी माहिती प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांनी केले आहे.
काय असेल प्रदर्शनामध्ये
या प्रदर्शनामध्ये स्वयंसहाय्यता समूहानी उत्पादित केलेल्या विविध प्रकारच्या कलात्मक वस्तू (बुरुड काम, गोधडी, लोकरीच्या विणकाम केलेल्या वस्तू, क्रेयॉनच्या वस्तू, इमिटेशन ज्वेलरी इ.), विविध प्रकारचे घरगुती मसाले (मालवणी मसाले), विविध प्रकारची पिठे, पापड (नाचणी, उडीद, लसूण, सोयाबीन, पालक, बीट, टोमॅटो, पोहा, ओवा इ.), लोणची (आंबा, लिंबू, मिरची, आवळा, करवंद इत्यादी), कोकम, आगळ इ., कोकणी मेवा (काजूगर, काजू मोदक, आंबावडी, आमरस, आंबापोळी, आवळा मावा, फणसपोळी, करवंदवडी, तळलेले गरे इ.), विविध फळांची सरबते (जांभूळ सिरप, आंबा सिरप, काजू सिरप, आवळा सिरप इत्यादी), आमरस, कोकणी खाद्यपदार्थ (मोदक, आंबोळी, थालीपीठ, पुरणपोळी, घावणे, नारळवडी), जेवण, नर्सरी, विविध प्रकारची शोभिवंत फुलझाडे, बोन्साय इ. माफक दरात उपलब्ध होणार आहेत.