
सिंधुदुर्गनगरी प्राधिकरणमधून 40.29 हेक्टर जमीन वगळली
सिंधुदुर्गनगरी प्राधिकरणमधून
४०.२९ हेक्टर जमीन वगळली
स्थानिकांना दिलासा ः ब्रिगेडियर सावंत यांचे प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २१ ः सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणमधून ४०.२९ हेक्टर जमीन वगळली असल्याची राज्य शासनाने अधिसूचना जाहीर केली असून ओरोस (बु.) गावातील जनतेसाठी शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना २ एप्रिल १९९८ मध्ये झाली. यामध्ये ओरोस (बु.), रानबांबुळी व अणाव या गावांचा समावेश आहे. त्यावेळी ओरोस (बु.) मधील जवळपास ४५ हेक्टर क्षेत्र सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकराणामध्ये आरक्षित केले होते. हे क्षेत्र वगळण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी त्यासाठी खास प्रयत्न केले. मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गालगतची पश्चिम बाजू आणि नाला यामधील सुमारे ४५ हेक्टर क्षेत्र वगळण्यासाठीचा प्रस्ताव राज्याकडे पाठविण्यात आला होता. ओरोस (बु.) मधील जनतेच्या अनेक वर्षाच्या मागणीला माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला आहे. सिंधुदुर्गनगरी नवनगरासाठी अधिसूचित केलेल्या क्षेत्रामधून मुंबई –गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिम बाजू आणि नाला यामधील महामार्गात गेलेले क्षेत्र सोडून सर्वे नंबर ३७ ते ५१ मध्ये येणारे सुमारे ४०.२९.२५ हेक्टर आर क्षेत्र वगळण्यात आल्याची अधिसूचना २९ नोव्हेंबरला शिंदे सरकारने काढली आहे. ही अधिसूचना राज्य शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी माजी खासदार ब्रिगेडियर सावंत यांनी खास प्रयत्न केले. म्हणून ओरोस (बु.) मधील जनतेने समाधान व्यक्त करून त्यांचे विशेष आभार मानले आहेत.