
खेड-संक्षिप्त पट्टा
खेडमध्ये कबड्डी संघाचे प्रशिक्षण शिबिर
खेड ः भरणे येथील श्री देवी काळकाई देवस्थान ट्रस्ट व काळकाई कला क्रीडा केंद्रातर्फे काळकाई मंदिर येथे सराव शिबिराचे उद्घाटन झाले. अहमदनगर येथे राज्यस्तरीय पुरुष व महिला अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २७ ते ३० डिसेंबर दरम्यान होणार आहे. स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे पुरुष व महिला संघ सहभागी होणार आहेत. काळकाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री सचिन जाधव, उपाध्यक्ष श्री भुवड साहेब, सचिव सुजित शिंदे, खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे व रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष सतीश चिकणे यांच्या हस्ते उदघाटन झाले.
फोटो ओळी
-rat२२p२२.jpg-KOP22L70340 खेड ः वेदांत मोरे याचा सत्कार करताना शिक्षक.
------------
देवघर शाळेचा वेदांत मोरे नासा भेटीसाठी पात्र
खेड ः तालुक्यातील दुर्गम अशा देवघर निवाचीवाडी केंद्र शाळेतील विद्यार्थी वेदांत विठ्ठल मोरे याने केंद्र स्तर प्रभाग स्तर व तालुकास्तर निवड चाचणी पार करून रत्नागिरीत झालेल्या अंतिम चाळणी परीक्षेमध्ये यश मिळवून नासा व इस्रो भेटीसाठी पात्र ठरला. वेदांतला देवघर-निवाचीवाडी शाळेतील शिक्षिका विधी बने व मुख्याध्यापक मोहन चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. आंबवली प्रभागाचे शिक्षण अधिकारी सखाराम मोहिते व केंद्रप्रमुख विनायक नलावडे यांनी शाळेला वेळोवेळी भेटी देऊन वेदांत व शिक्षकांना मार्गदर्शन केले.
खेडमध्ये लम्पीमुळे ४८ जनावरे दगावली
खेड ः तालुक्यात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून दिवसागणिक बाधित जनावरांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शेतकऱ्यांसह पशुधन विकास विभागाची डोकेदुखी कायमच आहे. आतापर्यंत तब्बल ४८ जनावरे लम्पी आजाराने दगावल्याची माहिती येथील पंचायत समितीच्या पशुधन विभागाकडून देण्यात आली. तालुक्यात मांडवे, तळे, कुडोशी, धामणंद, कुरवळ जावळीसह अन्य १० ते १२ गावांमध्ये लम्पीच्या आजाराने डोके वर काढले. गेल्या दोन महिन्यात तालुक्यात तब्बल ३६२ लम्पीच्या आजाराने बाधित
जनावरांची नोंद झाली आहे. लम्पीचा फैलाव वाढल्यानंतर पशुधन विभागाने जनावरांच्या लसीकरणाची मोहीम अधिक तीव्र केली. मात्र लसीकरण करूनही जनावरे लम्पीबाधित होत असल्याने शेतकऱ्यांसह पशुधन विभागाची चिंता कायम आहे.
खेडमध्ये अजगरास जीवदान
खेड ः शहरातील महाडनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज नगरसमोरील तांबे सर्व्हिसिंग सेंटरच्या १५ मीटर लांब पाईपमध्ये शनिवारी सायंकाळी अडकलेल्या अजगरास छत्रपती वाईल्ड लाईफ फाऊंडेशनच्या प्राणीमित्रांनी बाहेर काढून जीवदान दिले. याठिकाणी अजगर असल्याची माहिती मिळताच फाऊंडेशनचे सदस्य सर्वेश पवार, रोहन खेडेकर, सुरज जाधव, राजेश खेडेकर,प्रथमेश गिम्हवणेकर, युवराज मोरे, सागर खेडेकर, श्वेत चोगले, यश खेडेकर यांनी पाईपमध्ये अडकलेल्या अजगराला सुरक्षितरित्या बाहेर काढले. यासाठी त्यांना माजी नगरसेवक बाळा खेडेकर यांचे सहकार्य लाभले. या अजगराला सर्पमित्रांनी नैसर्गिक अधिवासात सोडून जीवनदान दिले.
न्यू मांडवे धरणासाठी उपोषणाचा इशारा
खेड ः गेली अनेक वर्षे रखडलेल्या खेडतालुक्यातील न्यू मांडवे धरण प्रकल्पाच्या कामाला सुरवात व्हावी, येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे यासाठी प्रकल्प पुनर्वसन समितीची बैठक नुकतीच झाली. बैठकीत या प्रकल्पाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषणाचा निर्धार करण्यात आला आहे. २६ जानेवारीला उपोषणाचा इशारा निवेदनद्वारे देण्यात आला आहे. न्यू मांडवे धरणाचे काम २८ वर्षांपूर्वी सुरू झाले. शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या, तेव्हा त्या जमिनींचा योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना तत्काळ दिला जाईल, धरण क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांचे योग्य त्या ठिकाणी पुनर्वसन केले जाईल असे आश्वासन दिले गेले होते. मात्र शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. न्यू मांडवे धरण प्रकल्पग्रस्त पुनर्वसन उत्कर्ष कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीच्या बैठकीत आक्रमक पवित्रा घेण्यात आला असून २६ जानेवारीला उपोषणचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात समितीच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, पालकमंत्री, विरोधी पक्षनेते कार्यक्षेत्रातील खासदार, आमदार आदींना निवेदन देण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशनमध्ये तारांकित प्रश्न मांडून धरणाचा विषय सोडवावा यासाठी कमिटीने लक्ष वेधले आहे. निवेदन देताना कमिटीचे खजिनदार कृष्णा शेलार, कमिटी उपाध्यक्ष बाबाराम दगडू पवार, कमिटी सदस्य रघुनाथ तुकाराम गायकवाड व दीपक मोहिते, सुधाकर मोरे आदी उपस्थित होते.
-------------
मांडवे मोबाईल टॉवर कार्यान्वित
खेड ः तालुक्यातील मांडवी येथील बंदावस्थेत असलेला बीएसएनएलचा मोबाईल टॉवर अखेर कार्यान्वित झाला आहे. या टॉवरमुळे मांडवेसह तळे, जैतापूर, घेरासुमारगड, वाडीबेलदार, पुरे, शिंगरी, किंजळे, दहिवली, घोगरे आदी गावांतील ग्रामस्थांना मोबाईलची सेवा प्राप्त झाल्याने ग्रामस्थांच्या संवादाच्या देवाणघेवाणीतील अडथळे दूर झाले आहेत. या १० गावांमध्ये मोबाईल नेटवर्क नसल्याने मांडवे
ग्रामपंचायतीच्या हद्दीत बीएसएनएलने एक वर्षापूर्वी टॉवर उभारला होता. मात्र हा टॉवर कार्यान्वित न झाल्याने ग्रामस्थांचा हिरमोड झाला होता. गेल्या वर्षभरापासून हा टॉवर कार्यरत नव्हता. हा टॉवर कार्यान्वित करण्यासाठी मांडवेसह अन्य गावच्या ग्रामपंचायती, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था यांनी सातत्याने बीएसएनएल कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. पाठपुराव्याला यश आले असून मांडवेतील बीएसएनएलचा टॉवर कार्यान्वित झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.