पान एक-टोलमुक्‍ती न झाल्‍यास रस्त्यावरची लढाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-टोलमुक्‍ती न झाल्‍यास रस्त्यावरची लढाई
पान एक-टोलमुक्‍ती न झाल्‍यास रस्त्यावरची लढाई

पान एक-टोलमुक्‍ती न झाल्‍यास रस्त्यावरची लढाई

sakal_logo
By

KOP22L70353
ओसरगाव : येथे व्यापारी महासंघ, टोल मुक्‍त संघर्ष समिती, विविध राजकीय नेतेमंडळी, पदाधिकारी यांची बैठक झाली.

टोलमुक्‍ती न झाल्‍यास रस्त्यावरची लढाई
ओसरगावमधील सभेत निर्धार ः विविध संघटना, राजकीय लोकप्रतिनिधींची बैठक
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २२ : सिंधुदुर्ग पासिंगच्या वाहनांना ओसरगाव टोल नाक्‍यावर टोल माफी मिळायलाच हवी. त्‍यासाठी प्रथम सर्व लोकप्रतिनिधींना निवेदने दिली जाणार आहेत. तर दुसऱ्या बाजूने न्यायालयीन लढाई केली जाणार आहे. तरीही टोलमाफीबाबत निर्णय न झाल्‍यास सर्व जिल्‍हावासीयांना सोबत घेऊन रस्त्यावरची लढाई लढण्याचा निर्णय आज ओसरगाव येथील बैठकीत घेण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्‍हा व्यापारी महासंघ, टोलमुक्त संघर्ष समिती यांच्यावतीने ओसरगाव टोलनाका लगतच्या हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीला व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके, टोलमुक्‍त संघर्ष समितीचे अध्यक्ष सतीश लळीत, नंदन वेंगुर्लेकर, माजी आमदार परशुराम उपरकर, शिवसेना नेते संदेश पारकर, काँग्रेसचे जिल्‍हाध्यक्ष इर्शाद शेख, वंचित बहुजन आघाडीचे महेश परुळेकर, ॲड. विलास परब, कणकवली व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेवलकर, माजी नगरसेवक विलास कोरगावकर, सामाजिक कार्यकर्ते विनायक उर्फ बाळू मेस्त्री आदी उपस्थित होते.
नितीन वाळके यांनी ओसरगाव येथील टोलची झळ केवळ व्यापारी वर्ग, पर्यटक यांनाच बसणार नाही, तर सर्वसामान्य नागरिकांनाही टोलचा मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्‍यामुळे टोलमुक्‍तीच्या लढ्यात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. संदेश पारकर म्‍हणाले की, खारेपाटण किंवा बांदा-पात्रादेवी या दरम्‍यान टोल नाका उभा करण्याची गरज होती; मात्र जिल्ह्याच्या मध्यवर्ती अशा ओसरगावला टोल नाका उभारण्यात आला आहे. त्‍याचा मोठा भुर्दंड कणकवली, वैभववाडी, देवगड आणि काही प्रमाणात मालवण तालुक्‍यातील अनेक गावांतील वाहनचालक, नागरिक यांना बसणार आहे. टोलचा राजकीय पुढाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही. आमदार, खासदार आणि मंत्र्यांना टोलमाफी आहे; मात्र सर्वसामान्य नागरिक यात भरडला जाणार आहे. त्‍यामुळे टोलमुक्‍तीच्या लढ्यात शिवसेना पूर्ण ताकदीने उतरणार आहे. उमेश वाळके म्‍हणाले की, टोल मुक्‍तीसाठी व्यापारी महासंघाने घेतलेला पुढाकार महत्त्‍वाचा असून या लढ्यात सर्व नागरिक जोडले जायला हवेत. परशुराम उपरकर यांनी टोल विरोधातील लढ्यात मनसेतर्फे रस्त्यावर उतरणार असल्‍याची ग्‍वाही दिली. सर्व राजकीय पक्षांच्या तीव्र विरोधामुळे आतापर्यंत ओसरगाव टोल नाक्‍यावर टोल वसुली सुरू झालेली नाही. आता टोल माफीसाठी प्रखर लढा देण्याची गरज आहे, असा निर्धार यावेळी करण्यात आला.
या बैठकीत टोलमाफीसाठी टप्पाटप्याने आंदोलन करण्याचे निश्‍चित करण्यात आले. यात पहिल्‍या टप्प्यात सर्व राजकीय नेतेमंडळी, मंत्री, आमदार, खासदार यांना टोलमाफीबाबत निवेदन देण्याचे निश्‍चित करण्यात आले. त्‍याचबरोबर टोलमाफीसाठी न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर तिसऱ्या टप्प्यात रस्त्यावर उतरून लढाई करण्याचे निश्‍चित करण्यात आले.
या बैठकीला शिवसेना शिंदे गट महिला जिल्‍हाप्रमुख वर्षा कुडाळकर, शिवसेना ठाकरे गट जिल्‍हाप्रमुख सुजित जाधव, दीपक आळवे, नीलेश धडाम, संतोष कदम, गौरीनंदन परब, श्रेयश कदम, नामदेव मठकर, श्रीकृष्ण शिरोडकर, संजय भोगटे, द्वारकानाथ घुर्ये, सदानंद मोरे, नीलम शिंदे, अनघा रांगणेकर, जयदीप तुळसकर, प्रसाद कसालकर आदी उपस्थित होते.
------------
चौकट
पुढील बैठक २८ डिसेंबरला
ओसरगाव येथे झालेल्‍या आजच्या बैठकीत टोलमाफीबाबत पुन्हा २८ डिसेंबरला कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात बैठक घेण्याचे निश्‍चित केले. या बैठकीत टोलमाफीच्या आंदोलनाबाबतची पुढील दिशा निश्‍चित केली जाणार आहे. त्‍याअनुषंगाने विविध संघटनांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी कणकवलीतील बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्‍हा व्यापारी महासंघ आणि टोलमुक्‍त संघर्ष समिती यांच्यावतीने करण्यात आले.

चौकट
.... तर पर्यायी रस्त्याचा विचार
ओसरगावमधील चार वाड्यांतील नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र, रेशन दुकान आणि शाळा यासाठी वारंवार टोल नाका ओलांडावा लागणार आहे. त्यासाठी छोट्या वाहनांना प्रत्येकी ३२० रुपयांचा पास द्यावा लागणार आहे. इथल्या चार वाडीतील नागरिकांना आरोग्य केंद्र, रेशन आणि शाळा येथे जाण्या-येण्यासाठी किमान पाच ते सात लाख रुपये टोल द्यावा लागणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील सर्व प्रकारच्या वाहनांना टोल माफी न मिळाल्यास आम्ही टोल नाक्याला पर्यायी रस्ता काढण्याच्या विचारात आहोत, अशी माहिती ओसरगाव येथील ग्रामस्थ अॅड. विलास परब यांनी या सभेत दिली.