
पालघरवाडीचा मताधिकार देखावा राज्यात प्रथम
फोटो ओळी
-rat22p18.jpg- KOP22L70328 मंडणगड ः पालघरवाडी येथे साकारण्यात आलेला मताधिकार जिवंत देखावा.
---------------
पालघरवाडीचा मताधिकार देखावा राज्यात प्रथम
निवडणूक आयोग स्पर्धा; लोकशाही बळकटीसह वसुंधरा संवर्धन जागृती
मंडणगड, ता. 2 ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात मंडणगड तालुक्यातील पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने माझा गणेशोत्सव माझा मताधिकार ही संकल्पना राबविताना भारताची लोकशाही बळकट करण्याचा दिलेल्या संदेश रुपी जिवंत देखाव्याला निवडणूक आयोगाच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे. मतदार दिनी (ता. 25 जानेवारी) त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाने ऑगस्ट- सप्टेंबर 2022 मध्ये माझा गणेशोत्सव माझा मताधिकार ही संकल्पना राबविताना गणेशोत्सवात स्पर्धा राबविली होती. तालुक्यातील पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सामाजिक जनजागृती करताना यावर्षी नागरिकांचा मताधिकार यावर देखाव्यांच्या माध्यमातून भाष्य केले. प्रवेशद्वारावर पृथ्वीची गोलाकार प्रतिकृती फिरत असून त्यातून भारतमाता अवतरित होती. उजव्या बाजूला देशाचे रक्षण करणारे जवान तर डाव्या बाजूला शेतकरी राजाने उभे राहून महत्व पटवून दिले. यावेळी भारतमातेने आपल्या मुखातून लोकशाहीचे महत्व सांगताना जल संवर्धन, गडकिल्ले संवर्धन, वसुंधरा संवर्धनाचा संदेश देते. तसेच लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी आमिषांना बळी न पडता योग्य लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी आपला बहुमूल्य मताचा अधिकार बजावावा असे आवाहन केले.
योग्य लोकप्रतिनिधी निवडावा असा संदेश देत महत्वाच्या गोष्टींवर भाष्य करीत नागरिकांचे प्रबोधन केले. प्रतिमेच्या रूपातील महापुरुष लक्ष वेधून घेत त्यांनी देश स्वातंत्र्यासाठी केलेले बलिदानाचे स्मरण करायला लावीत लोकशाहीसाठी मताधिकाराची जागृती केली. आतमध्ये मध्यभागी उभा असलेला डेरेदार प्राचीन वृक्षाने आपले महाकाय अस्तित्व दाखविताना आपल्या प्रत्येक अवयवातून लोकशाहीचा आत्मा असणारा मताधिकार बजाविण्याचा संदेश देत विचार करायला भाग पाडले.
कोट
मंडळाने याआधी जिल्हा स्तरावर अनेक प्रथम क्रमांकाचे पुरस्कार मिळविले. मात्र नुकताच जाहीर झालेला निवडणूक आयोगाच्या राज्य स्तरावरील प्रथम क्रमांक पुरस्काराने नवी ऊर्जा मिळाली असून सामाजिक जागृतीचा घेतलेला वसा पुढेही जोपासण्यात येईल.
- अनंत घाणेकर, ग्रामस्थ पालघरवाडी