
वेंगुर्लेत उद्यापासून ''खेळ आठवणीतले''
वेंगुर्लेत उद्यापासून ''खेळ आठवणीतले''
वेंगुर्ले, ता. २२ः ‘माझा वेंगुर्ला’तर्फे २४ ते २६ डिसेंबर या कालावधीत सायंकाळी ३ ते ६ वाजेपर्यंत कॅम्प येथील पालिकेच्या क्रीडांगणावर ‘खेळ आठवणीतले’ अंतर्गत जुने-नवे पारंपरिक खेळले जाणार आहेत. यामध्ये हुतूतू, लंगडी, साखळी, लगोरी, आट्यापाट्या, अची-पची, रिग-रुमाल, विटीदांडू, काजूंचे खेळ, ताईचा रुमाल, साईकल टायर, रिंग-रनिंग, स्लो सायकलिंग, गजरे, आपरी-खापरी, डबा एक्स्प्रेस, भोवरे, धनगर-शेळी-वाघ, डोंगर की पाणी, खांब-खांब, रस्सीखेच, दोरी उडी, उठबस, पासरनिंग आदी खेळांचा समावेश आहे. सर्वांनी उपस्थित राहून खेळांचा आनंद लुटावा, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी राजश्री कोल्ड्रिंक्स, इंद्रनील येथे संपर्क साधावा.
.................
तुळस येथे २८ ला रस्सीखेच स्पर्धा
वेंगुर्ले, ता. २२ः वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळसच्यावतीने व सिंधुदुर्ग जिल्हा रस्सीखेच संघटनेच्या मान्यतेने पुरुष रस्सीखेच स्पर्धा आणि शालेय गटासाठी (मुले) स्पर्धेचे आयोजन २८ ला श्री जैतीर मंदिर तुळसच्या मैदानावर दुपारी ४ वाजता केले आहे. खुला-पुरुष गटासाठी प्रथम व द्वितीय क्रमांकासाठी अनुक्रमे ४०००, २००० रुपये व प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र असे पारितोषिक असून शालेय गटासाठी १०००, ७०० रुपये प्रत्येकी चषक आणि सर्व सहभागी शालेय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. खुला पुरुष गट स्पर्धेतील बेस्ट फ्रंटमेन आणि बेस्ट लास्टमेन यासाठी प्रत्येकी रोख ५०० रुपये, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धकांनी ओळख पुरावा म्हणून आधारकार्ड आणणे बंधनकारक आहे. इच्छुक संघानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांच्याशी संपर्क साधावा.
................
देवगडात गुलाबी थंडी
देवगड, ता. २२ ः तालुक्याच्या किनारपट्टी भागात आज सकाळी गारवा जाणवत होता. आज सकाळी गुलाबी थंडीचा अनुभव स्थानिकांनी घेतला. मध्यंतरी पावसाळी वातावरण तयार होत हवेतील उष्णतेत वाढ झाली होती. पाऊस कोसळण्याची लक्षणे दिसत होती. त्यातच आता थंडी जाणवू लागली आहे. दिवसभर वातावरणात गारवा जाणवत होता.
..............