मळगाव रस्त्यालगत खोदाई धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मळगाव रस्त्यालगत खोदाई धोकादायक
मळगाव रस्त्यालगत खोदाई धोकादायक

मळगाव रस्त्यालगत खोदाई धोकादायक

sakal_logo
By

70469
मळगाव : येथील घाटरस्त्यातील खोदकाम अपघातास कारणीभूत ठरत आहे.

मळगाव रस्त्यालगत खोदाई धोकादायक

जलवाहिनीसाठी खोदकाम; खबरदारीअभावी अपघाताची भीती

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ ः मळगाव घाटरस्त्यामध्ये पाईपलाईनसाठी करण्यात आलेले खोदकाम रात्रीच्या वेळी वाहन चालकांना धोकादायक ठरत आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे बॅरिकेट व रिफ्लेक्टर लावण्यात न आल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. याकडे संबंधित कंपनी व बांधकाम विभाग लक्ष देत नसल्याने अपघात झाल्यास कारणीभूत कोण, असा सवाल वाहन चालकांतून केला जात आहे.
मळगाव घाटरस्त्यामध्ये गॅस पाईपलाईनसाठी खोदकाम करण्यात आले आहे. सद्यस्थितीत हे खोदकाम तेथील ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांसाठी रोखले आहे. त्यामुळे अर्धवट स्थितीत खोदलेले हे काम ''जैसे थे'' आहे. खोदकामाची माती रस्त्यावर असून सावंतवाडीहून येताना तीव्र उतार असल्याने वाहन चालक सुसाट असतात. रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या वाहनांच्या लाईटमुळे रस्त्यावरील माती व खोदकाम दिसून येत नाही. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता जाणवते. संबंधित पाईपलाईन टाकणाऱ्या कंपनीने या ठिकाणी उपाययोजना म्हणून बॅरिकेट्स किंवा रिफ्लेक्टर लावणे गरजेचे होते. जेणेकरून वाहन चालकांना समोरील धोका सहज लक्षात आला असता; परंतु हे करण्याची तसदी कंपनीकडून झाली नाही. दुसरीकडे बांधकाम विभागानेही याकडे दुर्लक्ष केले आहे. एखाद्या वेळेस अपघात होऊन जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल व्यक्त होत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत हे काम बंद असले तरी रस्त्यावरील माती वाहन चालकांच्या नजरेस यावी, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे; अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुळात ज्या कंपनीकडून गॅस पाईपलाईनचा ठेका घेतला आहे, त्यांनी खोदकाम करताना रस्त्याच्या डागडुजीकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. सावंतवाडी-शिरोडा मार्गावर पाईपलाईन टाकताना नव्याने बनविण्यात आलेल्या रस्त्याची नुकसानी केली आहे. बऱ्याच ठिकाणी रस्ता उखडलेला आहे; परंतु याकडे बांधकाम विभाग सोयीस्कर पूर्ण दुर्लक्ष करत असल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली.
--
बांधकाम विभाग ‘नॉट रिचेबल’
एकीकडे या रस्त्यावरील खड्ड्याने हैराण झालेल्या वाहन चालकांना अलीकडेच नवीन डांबरीकरणामुळे दिलासा मिळाला असतानाच खोदकामावेळी रस्त्याच्या होणाऱ्या नुकसानीकडे बांधकाम विभाग का दुर्लक्ष करत आहे, या मागचे गौडबंगाल काय, असा सवाल वाहनचालकांतून केला जात आहे. एकूणच या प्रश्नासंदर्भात बाजू जाणून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.