बांद्यात महामार्गालगतचे स्टॉल हटवणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांद्यात महामार्गालगतचे स्टॉल हटवणार
बांद्यात महामार्गालगतचे स्टॉल हटवणार

बांद्यात महामार्गालगतचे स्टॉल हटवणार

sakal_logo
By

70488
बांदा ः महामार्गालगत उभारण्यात आलेले स्टॉल आठ दिवसांत हटविण्यात येणार आहेत. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)


बांद्यात महामार्गालगतचे स्टॉल हटवणार

६५ जणांना नोटिसा; कट्टा कॉर्नर भागात याआधी तीनदा मोहीम

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २२ ः मुंबई-गोवा चौपदरी महामार्गावर बांदा कट्टा कॉर्नर येथे मंजूर झालेल्या उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामास लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याने रस्त्यालगत अनधिकृत उभारण्यात आलेले स्टॉल काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कार्यालयाकडून आज शहरातील ६५ स्टॉलधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या. सात दिवसांत स्टॉल व बांधकामे न हटविल्यास महामार्ग विभागाने कारवाईचा बडगा उभारण्याचा इशारा नोटिसीमध्ये दिल्याने स्टॉलचालकांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे.
बांद्यात बसस्थानक ते स्मशानभूमीपर्यंत ६०० मीटर लांबीचे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. यासाठी १०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या ठिकाणी पहिल्या टप्प्याच्या कामास प्रारंभही करण्यात आला आहे. आता प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याने ८ दिवसांत स्टॉल हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या बांदा शहराच्या हद्दीत अतिक्रमण करून स्टॉल व बांधकामे उभारण्यात आली आहेत. रस्त्यालगत उड्डाणपूल कामाला अडथळा ठरणारे ६५ स्टॉल हटविण्यात येणार आहेत. सर्व स्टॉलधारकांना काल (ता. २२) नोटिसा बजावण्यात आल्या. येत्या सात दिवसांत स्टॉल काढावेत; अन्यथा कारवाई करून स्टॉल काढण्यात येतील, असे नोटिसीत म्हटले आहे. शहरात महामार्गाच्या दुतर्फा कट्टा कॉर्नर ते बसस्थानक परिसरात बेरोजगार युवकांनी रोजीरोटीसाठी शेकडो स्टॉल उभारले आहेत. यातील बरेचसे स्टॉलधारक ग्रामीण भागातील आहेत. यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे स्टॉल हटावचा थेट परिणाम त्यांच्या रोजगारावर होणार आहे. बांद्यात यापूर्वी महामार्ग रुंदीकरणासाठी १९९२, २००६ व २००९ मध्ये अनधिकृत स्टॉल हटविण्यात आले होते. आता चौथ्यांदा बांद्यात स्टॉल हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे.
----------------
याआधीचा घटनाक्रम
१) राष्ट्रीय महामार्ग विभागाचे तत्कालीन उपविभागीय अभियंता प्रकाश शेडेकर यांनी २६ जानेवारी २०१९ रोजी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय आईर यांच्या उपोषणावेळी बांदा येथे अनधिकृत स्टॉल लवकरात लवकर हटविण्याचे संकेत दिले होते. त्यावेळी त्यांना विरोधही झाला होता.
२) शेडेकर यांची बदली झाल्याने स्टॉल हटाव मोहीम बारगळली होती. नियोजित झाराप-पत्रादेवी चौपदरी महामार्गाच्या रुंदीकरणासाठी २००६ मध्ये महामार्गालगतचे स्टॉल हटविले होते; मात्र रुंदीकरणाच्या कामास उशीर केल्याने पुन्हा स्टॉल उभारण्यात आले होते.
३) महामार्गाच्या प्रत्यक्ष कामास जानेवारी २००९ मध्ये सुरुवात झाली. त्यावेळी तिसऱ्यांदा स्टॉल हटाव मोहीम राबविण्यात आली. तिन्ही वेळेस स्टॉल हटाव मोहीम ही निवडणूक आचारसंहिता कालावधीतच राबविली होती.
४) एप्रिल २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाने स्टॉल हटविण्यासंदर्भात स्टॉलधारकांना नोटिसा पाठविल्या होत्या.
५) निवडणूक आचारसंहिता कालावधीत स्टॉल हटाव मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र आमदार नीतेश राणे यांनी मध्यस्थी केल्याने स्टॉल हटाव मोहीम बारगळली होती.
..............
70489
उपासमारीची वेळ
ग्रामीण भागातील युवकांनी अर्थसहाय्य घेऊन या ठिकाणी स्टॉल उभे केले आहेत. गेली २५-३० वर्षे या ठिकाणी ते आपला व्यवसाय करत आहेत. सर्व स्टॉलधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे शासनाने स्टॉलधारकांच्या पुनर्वसनासाठी पर्यायी जागेचा विचार करावा; अन्यथा आमच्यावर उपासमारीची वेळ येणार असल्याची भावना स्टॉलधारकांनी व्यक्त केली आहे.
.................
कोट
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या बांदा शहराच्या हद्दीत अतिक्रमण करून स्टॉल व बांधकामे उभारली आहेत. उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असून आज शहरातील महामार्गलगतच्या ६५ स्टॉलधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. स्टॉल न काढल्यास कारवाई करून स्टॉल हटविण्यात येणार आहेत.
- महेश खटी, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग