
सहकारात निःस्वार्थी माणसे हवीत
70511
कुणकेश्वर ः येथे नंदकुमार घाटे यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)
सहकारात निःस्वार्थी माणसे हवीत
नंदकुमार घाटे ः कुणकेश्वर सोसायटीचा अमृत महोत्सव
देवगड, ता. २३ ः सहकारामध्ये निःस्वार्थी माणसे हवीत. पदरमोड करून काम करण्याची मानसिकता असल्यास सहकारामध्ये उन्नती साधता येते, असे मत उद्योजक नंदकुमार घाटे यांनी कुणकेश्वर येथे व्यक्त केले. सहकारातील आजवरच्या यशामध्ये पुढील पिढीने सातत्य राखले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
कुणकेश्वर (ता.देवगड) येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात घाटे बोलत होते. मंचावर सरपंच चंद्रकांत घाडी, सोसायटी अध्यक्षा मीना बोंडाळे, उपाध्यक्ष सुहास नाणेरकर, अमृत महोत्सवी समिती अध्यक्ष तुकाराम तेली, श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे, संपदा बोंडाळे, शीतल खोत, रमाकांत पेडणेकर, अजय नाणेरकर आदी उपस्थित होते. यावेळी घाटे यांच्या हस्ते दिनदर्शिका प्रकाशन झाले. संस्थेच्या आजवरच्या वाटचालीमधील पदाधिकारी, कर्मचारी तसेच हितचिंतकांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तेली यांनी संस्थेच्या कार्याचा धावता आढावा घेतला. घाटे यांनी, ग्रामीण भागात सहकारामध्ये भरारी घेण्यासाठी काम करताना आपला वेळ द्यावा लागतो. सर्वांच्या साथीने विकास साधता येतो. सहकारामध्ये गाव समृद्ध करण्याची ताकद असल्याने निःस्वार्थीपणे काम करताना पदरमोड करण्याची तयारी असावी लागते, असे सांगितले. लब्दे यांनी, गावातील शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टीने त्यांना सहकार्य करण्याची भावना जपली पाहिजे. शेतकऱ्यांसाठी योजना राबविण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे सांगितले. सरपंच घाडी यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी नीलेश पेडणेकर, नागेश आचरेकर यांच्यासह अन्य उपस्थित होते. श्रीकांत बोंडाळे यांनी आभार मानले.
......................
चौकट
वर्षभर विविध कार्यक्रम
संस्थेची स्थापना २३ डिसेंबर १९४८ ला झाली. संस्थेने अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केल्यामुळे प्रारंभाचा कार्यक्रम झाला. आता वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.