
आशा, गटप्रवर्तक महिला धडकल्या जिल्हा परिषदेवर
rat२३p२७.jpg
७०५७७
रत्नागिरीः जिल्हा परिषदेवर धडकलेल्या आशा, गटप्रवर्तक महिला.
----------
आशा, गटप्रवर्तक महिला आक्रमक
प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर धडक; डिजिटल आरोग्य योजनेचे काम नको
रत्नागिरी, ता. २३ः ‘आभा’ अर्थात डिजिटल आरोग्य योजनेचे काम करण्याचे आदेश आरोग्य विभागाने काढले आहेत. हे काम आशा कर्मचाऱ्यांना देण्यात येऊ नये, या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यासाठी जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक महिलांनी संघटनेचे अध्यक्ष शंकर पुजारी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढला.
शिष्टमंडळाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांना मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा केली. सध्या ७८ कामे करण्यासाठीच आशा महिलांना दररोज आठ तासापेक्षा जास्त वेळ लागतो. शिवाय कामावर आधारित मोबदला मागील अनेक वर्षापासून वाढवलेला नाही. आरोग्य ओळखपत्र काढून देण्याबाबत परिपत्रक आले आहे. या कामासाठी एक कार्ड काढण्यासाठी दहा रुपये दिले जाणार आहेत, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे; परंतु हा मोबदला अत्यंत कमी आहे. आरोग्य ओळखपत्र काढण्याचे काम आशा महिलांनी करावे, असे परिपत्रक सहसंचालक आरोग्यसेवा यांनी काढले आहे; परंतु आशा व गटप्रवर्तक महिला या राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत काम करतात. त्यामुळे आशांना काम करण्याचा आदेश देणे सहसंचालक आरोग्यसेवा यांना अधिकार नाहीत. कारण, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशांना हे काम देण्याबाबतचा आदेश काढलेला नाही. इतकेच नव्हे तर आशा महिलांना अद्यापही मंजूर असूनही राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत अँड्रॉइड मोबाईल दिलेला नाही आणि हे आरोग्य ओळखपत्र काढण्याचे काम मोबाईलद्वारे करावे लागणार आहे. इतकेच नव्हे तर सर्वच आशा महिलांना मोबाईलवर आरोग्य ओळखपत्र काढून देणे शक्य नाही; परंतु आतापासूनच परिपत्रक काढून अनेक जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी हे काम केलेच पाहिजे, असे आशांना सांगत आहेत.
----------
चौकट
निवडणूक, माझे कुटुंबच्या कामाचा मोबदला नाहीच
दरम्यान, जिल्ह्यांमध्ये तीन वर्षापूर्वी निवडणुकीमध्ये काम करून घेतले आहे; परंतु मोबदला अद्याप दिलेला नाही. माझे कुटुंब माझी रत्नागिरी म्हणून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काम करून घेतलेले आहे; पण कामाचा मोबदलाही अद्याप दिलेला नाही. आशा महिलांना आरोग्य ओळखपत्र काढून देण्याबाबत किमान वेतनानुसार मोबदला देण्याबाबत आदेश करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.