
राजापुरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक आज, उद्या बंद
राजापुरातील मुख्य रस्त्यावरील
वाहतूक आज, उद्या बंद
मुख्याधिकारी भोसले ; तालिमखाना ते जवाहरचौक डांबरीकरणाला मुहूर्त
राजापूर, ता. २३ ः शहरातील रखडलेल्या तालीमखाना ते जवाहरचौक रस्त्याच्या डांबरीकरण-कारपेटच्या रखडलेल्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. या कामाला शनिवारपासून (ता. २४) सुरू होणार असून २५ डिसेंबरपर्यंत काम चालणार आहे. या दोन्ही दिवशी शहरातील या मुख्य रस्त्यावरील एसटीसह सर्व वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिली.
रस्त्याच्या कामाच्या कालावधीमध्ये एसटीसह सर्व वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असल्याने या कालावधीमध्ये नागरिक, वाहनचालक व प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन भोसले यांनी केले आहे. शहरातील रखडलेल्या तालीमखाना ते जवाहरचौक रस्त्याच्या डांबरीकरण-कारपेटचे काम गेले महिनाभर रखडले होते. काही तांत्रिक बाबींमुळे हे काम रखडले होते. आता शनिवारपासून हे काम सुरू होणार आहे. पेवर मशिनच्या साहाय्याने या रस्त्याचे डांबरीकरण-कारपेटचे काम केले जाणार आहे. गेले कित्येक वर्षे हा रस्ता व्हावा अशी नागरिक व वाहनचालकांची मागणी होती. या रस्त्याचे गेल्या काही दिवसांपासून रखडलेले हे काम उद्यापासून सुरू होणार आहे. या कालावधीत तालीमखाना ते जवाहरचौक या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. वाहनचालकांना शिवाजीपथ ते वरचीपेठ यासह अन्य पर्यायी मार्गाचा वाहतुकीसाठी वापर करता येणार आहे. या कालावधीत सगळ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन भोसले यांनी केले आहे.