
मुख्य जलवाहिनी फुटल्याने रस्त्यातच नाला
70608
रत्नागिरी - शहरातील जयस्तंभ गोडीबाब येथे शुक्रवारी मुख्य जलवाहिनी फुटून रस्त्यात पाणीच पाणी झाले.
70609
पाण्यामुळे काही ठिकाणी रस्ता वाहून गेला.
जलवाहिनी फुटल्याने रस्त्याचा नाला
रत्नागिरीतील जयस्तंभ-गोडीबाव येथे प्रकार; वाहिन्यांच्या दर्जाबाबत शंका
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पानवलच्या जलवाहिनी नुकतीच दुरुस्ती झाली आणि आता शहरातील जयस्तंभ-गोडीबाव येथे पुन्हा मुख्य जलवाहिनी फुटल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. या पाण्याच्या दबावामुळे रस्ता अनेक ठिकाणी वाहून गेला आहे. शहरात वारंवार मुख्य वाहिन्या फुटत असल्याने पुन्हा एकदा योजनेतील पाईपच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पालिकेमार्फत शुक्रवारी सायंकाळी शहरात पाणी सोडण्यात आले होते. तेव्हा जयस्तंभ ते गोडीबावच्या रस्त्यातून गेलेली जलवाहिनी फुटली. पाण्याला चांगलाच दबाव असल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाले. बराचवेळ पाणी गेल्याने काही ठिकाणी रस्ताही वाहून गेला. शहरात सुधारित पाणी योजनेला अजून वर्षही झालेले नाही. दररोज कुठेतरी पाईपलाईन फुटत आहे आणि लाखो लिटर पाणी वाहूत जात आहे. पाईपलाईन फुटत असल्याने पाणी पुरवठ्याचे तीन तेरा वाजले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून करण्यात आलेले रस्ते दुरूस्तीसाठी खोदले जात आहेत. त्यामुळे पाणी योजनेच्या सुमार दर्जाने आणि रस्त्यांच्या कामाबाबत योग्य नियोजन न झाल्याने संपूर्ण पैसा पाण्यात गेल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. शहरात आजही जेलनाका, आठवडा बाजार, नाचणे रोडला रस्त्ये खोदले जात आहेत. नुकतेच हे रस्ते करण्यात आले आहेत. पालिकेची पानवल धारणाची पाईपलाईन फुटून गेले चार दिवस लाखो लिटर पाणी वाया जात होते. त्याची दुरुस्ती आज पूर्ण झाली, पण तोपर्यंत शहरात पुन्हा पाईपलाईन फुटली.
एमजीपी (महाराष्ट्र जीवन प्राधिकरण) आणि पालिकेचे साटेलोटे आहे. सुधारित पाणी योजनेच्या या सुमार कामामुळे आज शहरात वारंवार पाईपलाईन फुटण्याच्या घटना घडत आहेत.
- मुन्ना चवंडे, माजी नगरसेवक, भाजप